सोशल मिडियाच्या माध्यमातून निवडणुकीची अर्धी लढाई जिंकण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संपर्क साधून तसेच छोटय़ा सभा आणि बैठकींमधून नवमतदारांशी संपर्क साधून भाजपचे मुद्दे खोडून काढावेत, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक दत्ता बाळसराफ यांनी शनिवारी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जी लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी साठ वर्षे लागली, ती लोकशाही व्यवस्था व लोकशाहीचा पाया उखडून टाकण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. हे काम प्रचार आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजप करत असून तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ओळखला पाहिजे, असे बाळसराफ यांनी यावेळी सांगितले. या माध्यमांच्या मदतीनेच भाजपचा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नवमतदारांशी सातत्याने संपर्क साधावा. तसेच नागरिकांशीही थेट संपर्क साधून त्यांच्यापर्यंत योग्य मुद्दे पोहोचवावेत. हे काम चिकाटीने करावे. कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या विरोधातील पक्ष तीनशेहून अधिक जागा जिंकणार आहेत याची खात्री बाळगा, असेही बाळसराफ यांनी सांगितले.
महिला, युवक तसेच युवतींसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामांची त्यांच्यासाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती वंदना चव्हाण यांनी यावेळी दिली. आघाडी सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांची आणि अंमलबजावणीची माहिती अंकुश काकडे यांनी दिली. माजी आमदार कमल ढोले, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, पंडित कांबळे, अशोक राठी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.