शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.एड्.) प्रवेश प्रक्रियेसाठी सामाईक प्रवेश परीक्षेची (सीईटी) दुसरी फेरी घेण्याचा उच्च शिक्षण संचालनालयाचा प्रस्ताव शासनाने फेटाळला असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी तरी सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अध्यापक महाविद्यालयांमध्ये बी.एड्. अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे सीईटी न दिलेले विद्यार्थीही आहेत. पुन्हा एकदा सीईटी घेतली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडूनही होत होती. या पाश्र्वभूमीवर बी.एड्.साठी पुन्हा एकदा सीईटी घ्यावी असा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने शासनाकडे पाठवला होता. मात्र, त्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीईटीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थीच बी.एड्. प्रवेशासाठी पात्र ठरतात. बी.एड्.ची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट अखेपर्यंत पूर्ण झाली. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयांमध्ये साधारण ४५ टक्के जागा रिक्त आहेत. जागा रिक्त राहू नयेत आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून  पुन्हा एकदा सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. या प्रस्तावात आवश्यक त्या सुधारणा करून तो परत पाठवण्यात येणार आहे. मात्र, यावर्षी दुसरी सीईटी होणार नाही. खासगी बी.एड्. महाविद्यालयांवर शुल्क नियंत्रण समिती बसवण्याची कार्यवाही सुरू आहे, असे उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.