कालवा समितीची बैठक झालेली नसतानाही पाटबंधारे विभागाने पाण्याचे उन्हाळी आवर्तन सुरू केले असून ऐन टंचाईच्या परिस्थितीतही खडकवासला धरणातून उसाला पाणी सोडले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. धरणातून पाणी सोडले जात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावर उस लागवड झालेली असल्याचे माहिती अधिकारातूनही स्पष्ट झाले आहे.
‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी सोमवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. खडकवासला धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा समितीची बैठक अद्यापही झालेली नाही. तरीही ती बैठक होऊन पाणी सोडण्यासंबंधीचे निर्णय होण्याआधीच २७ मार्चपासून शेतीच्या पाण्यासाठी उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या पाण्याचा वापर कोणत्या पिकांसाठी होणार याची माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकूण ५,४८८ हेक्टरपैकी २,००० हेक्टर (४० टक्के) क्षेत्रावरील उसासाठी हे सिंचन प्रस्तावित असल्याचे समजल्याचे वेलणकर म्हणाले.
वास्तविक, १९९३ च्या पीक आराखडय़ाप्रमाणे उसासाठी पाच टक्के सिंचनक्षेत्र अपेक्षित असताना ते नियम धाब्यावर बसवून ४० टक्के क्षेत्रावरील उसासाठी पाणी वापरणे हे नैतिक व कायदेशीरदृष्टय़ा चुकीचे आहे, असे सजग नागरिक मंचचे म्हणणे आहे. एकीकडे पुण्यात पाणीकपात सुरू आहे, तर दुसरीकडे नियम व मानके धुडकावून पाटबंधारे विभागातर्फे उसासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतचे पाणी राखून ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला द्यावेत, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.