गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी चोख तयारी केली आहे. या कार्यक्रमासाठी गुप्तचर यंत्रणांकडून घातपाताचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. मोदी यांच्या कार्यक्रमावर सीसीटीव्हींची नजर राहणार आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिली.
पुण्यात मोदी यांचा शुक्रवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी गरवारे महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर विमानतळाजवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. पाटणा येथे मोदी यांच्या सभेपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणांची आतापासूनच बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. त्याच बरोबर शहरातील लॉज, हॉटेल तसेच नवीन मोटारींची तपासणी केली जात आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक वाहनाजवळच चालकाने थांबले पाहिजे अशी सूचना देण्यात आली आहे. गुजरात पोलिसांचे एक पथकही सुरक्षेसाठी पुण्यात आले आहे, असे तांबडे यांनी सांगितले.