‘विश्व शेक्सपिअर दिवसा’चे औचित्य साधून ‘सर्वासाठी शेक्सपिअर’ हा २३ एप्रिल रोजी गेली १५ वर्षे सादर होणारा कार्यक्रम यंदाच्या वर्षी अखेरचा ठरणार आहे. हा कार्यक्रम आता पुण्याबाहेर करण्याचे विनय हर्डीकर यांनी ठरविले असल्याने पुणेकरांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग असलेल्या या कार्यक्रमाच्या आनंदापासून रसिक मुकणार आहेत.
जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन २३ एप्रिल हा विश्व शेक्सपिअर दिवस म्हणून साजरा केला जातो. चारशे वर्षांनंतरही या नाटककाराच्या कलाकृतींचे गारुड जगभरातील रसिकांच्या मनावर कायम आहे. काही समविचारी मित्रांच्या मदतीने विनय हर्डीकर यांनी ‘सर्वासाठी शेक्सपिअर’ हा उपक्रम २००१ मध्ये सुरू केला. शेक्सपिअरसंबंधी व्याख्याने, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, शेक्सपिअरच्या मराठीत अनुवाद झालेल्या नाटकांतील प्रवेशांचे अभिवाचन असे विविध कार्यक्रम सादर करून त्यांनी शेक्सपिअर सर्वसामान्य मराठी रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
एस. एम. जोशी सभागृह येथे २३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणारा या वर्षीचा कार्यक्रम हा या उपक्रमातील पुण्यामध्ये शेवटचा कार्यक्रम असेल, असे विनय हर्डीकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात मी गेल्या १५ वर्षांचा थोडक्यात आढावा घेऊन त्यानंतर ‘राजा लिअर’ (विंदा करंदीकर), ‘ऑथेल्लो’ आणि ‘राजमुकुट’ (मॅकबेथ – वि. वा. शिरवाडकर) या नाटकातील काही प्रवेशांचे अभिवाचन करून रसिकांचा निरोप घेणार आहे. पुढील वर्षीपासून मी शेक्सपिअर दिवस पुण्याबाहेर साजरा करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात शेक्सपिअर दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असलेल्या संस्थेला मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाची संकल्पना कशी सुचली, याबाबत हर्डीकर म्हणाले, १९९४-९५ मध्ये माझी वृत्तपत्रविद्या विभागामध्ये शेक्सपिअरवर दोन व्याख्याने झाली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेक्सपिअरविषयी उत्सुकता असलेला मोठा वर्ग आहे. हा लोकप्रिय नाटककार मराठी लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातून विचार करू लागलो आणि त्यातून २००१ मध्ये ‘सर्वासाठी शेक्सपिअर’ हा कार्यक्रम आकाराला आला. इंग्रजी वाङ्मयाची पाश्र्वभूमी असलेली आणि नसलेली अशी दोन्ही मंडळी या कार्यक्रमाला आली. त्यामुळे शेक्सपिअर सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा एक हेतू साध्य झाला. मात्र, पुण्यातील रंगभूमी संस्थांच्या सहकार्याने शेक्सपिअरच्या नाटकांची मराठी भाषांतरे वैभवशाली पद्धतीने रंगभूमीवर आणावीत, अशी कल्पना काही फलद्रूप होऊ शकली नाही. दोन वर्षांपूर्वी जागर संस्थेने परशुराम देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘हॅम्लेट’चे दोन प्रयोग केले होते.
शेक्सपिअर हा लोकप्रिय असूनही श्रेष्ठ नाटककार आहे. या लोकप्रियतेचे इंगित सिद्ध करावे या उद्देशातून सर्वासाठी शेक्सपिअर कार्यक्रमाची निर्मिती झाली. त्यानंतर बाहेरगावचे लोकही तुम्ही हा कार्यक्रम आमच्यासाठी कधी करणार, असे विचारू लागल्याने आता पुण्यातील कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. चार-पाच वर्षांपूर्वी ‘तुम्ही शेक्सपिअरचे फाजील स्तोम माजविले आहे,’ असा आरोप ठेवून अभिरूप न्यायालयात माझ्याविरोधात खटला चालविला होता. तर, ‘शेक्सपिअर हाजीर हो’ हे शीर्षक असलेला शेक्सपिअरवरील आरोपांचा खटला असाही नावीन्यपूर्ण कार्यक्रम पुणे आणि वाराणसी येथे झाला होता. या कार्यक्रमामुळे मला शेक्सपिअर सर्वागानी समजून घेण्याचा आनंद लुटता आला, असेही विनय हर्डीकर यांनी सांगितले.