18 October 2019

News Flash

गोवा मुक्ती मोर्चाचे सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे निधन

गेल्या काही महिन्यांपासून ते अन्ननलिकेच्या विकाराने ते त्रस्त होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्वातंत्र सेनानी पद्मश्री मोहन रानडे

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि गोवा मुक्ती मोर्चाचे सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी (दि. २५) पहाटे निधन झाले, ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते अन्ननलिकेच्या विकाराने ते त्रस्त होते. दरम्यान, त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान ते अत्यवस्थ होते, दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गोवा मुक्ती मोर्चामध्ये मोहन रानडे यांचे महत्वाचे योगदान होते. या मुक्तीसंग्रामामध्ये आझाद गोमंतक दलाचे नेते अशी त्यांची ओळख होती. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्याला मुक्त करण्यासाठी लढणाऱ्या रानडे यांना पोर्तुगाल सरकारने २६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच गोवा मुक्त झाल्यानंतरही त्यांना १४ वर्षे तुरुंगात रहावे लागले होते.

गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांची कामगिरी धाडसी आणि रोमांचक अशी होती. त्यांनी शिक्षक म्हणून गोव्यामध्ये आपले बस्तान बसवले आणि पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या कारवाईविरोधात त्यांना अटक झाली. त्यानंतर पुर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले.

रानडे यांची पोर्तुगाल सरकारच्या तावडीतून सुटकेसाठी तत्कालीन विरोधीपक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठवला होता. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांनी व्हॅटिकन सीटी येथे पोपची भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. त्यानंतर रानडे यांची सुटका झाली होती. दरम्यान, रानडे यांच्या सुटकेसाठी संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ची स्थापनाही करण्यात आली होती. मोहन रानडे यांच्या गोव्याच्या मुक्ती संग्रामातील योगदानाबद्दल गोवा सरकारने त्यांना ‘गोवा पुरस्कारा’ने गौरविले होते. तसेच केंद्र सरकारनेही त्यांचा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे. रानडे यांनी गोवा मुक्तिसंग्रामावर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तर ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तकही लिहिले आहे.

First Published on June 25, 2019 11:58 am

Web Title: goa mukti morchas fighter padma shri mohan ranade passed away at pune aau 85