प्रसाधनगृहात बिस्किटे लपवली; तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर आखाती देशातून आलेल्या विमानातील प्रसाधनगृहात ५२ लाख रुपयांची १४ सोन्याची बिस्किटे आढळून आली. तस्करी करून आणलेले सोने बाहेर घेऊन जाताना अडथळा येण्याची शक्यता वाटल्याने प्रवासी प्रसाधनगृहात सोन्याची बिस्किटे लपवून पसार झाल्याचा संशय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून विमान रविवारी पहाटे उतरले. आखाती देशातून तस्करी करून आणलेले सोने विमानातून आणल्याची माहिती कस्टमच्या पथकाला (एअर इंटलिजन्स युनिट) मिळाली. त्यानंतर कस्टमच्या पथकाने प्रवाशांची तपासणी केली. तेव्हा विमानतळावरून बाहेर पडलेल्या प्रवाशांकडे सोने आढळून आले नाही. पथकाने विमानाची तपासणी सुरू केली. तेव्हा प्रसाधनगृहातील वॉशबेसिनच्या खाली प्लास्टिकची पिशवी चिटकवून ठेवल्याचे निदर्शनास आले. पिशवीची पाहणी केली असता पिशवीत सोन्याची १४ बिस्किटे आढळून आली.

सोन्याच्या बिस्किटांचे वजन १६३३ ग्रॅम आणि किंमत ५२ लाख रुपये आहे. दुबईहून तस्करी करून आणलेले सोने विमानतळावरून बाहेर घेऊन जाताना पकडले जाण्याची शक्यता वाटल्याने प्रवाशाने सोने प्रसाधनगृहात लपवून ठेवल्याचा संशय आहे. या प्रकरणी भारतीय कस्टम कायदा १९६२ नुसार तस्करी करणाऱ्या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्टमचे उपायुक्त महेश  पाटील, अधीक्षक सुधांशु खैरे, माधव पळणीटकर, विनिता पुसदेकर, निरीक्षक बाळासाहेब हगवणे, घनश्याम जोशी, अश्विनी देशमुख, जयकुमार रामचंद्रन, संदीप भंडारी, ए. एस. पवळे आदींनी ही कारवाई केली.