दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी लोहगाव विमानतळावर पकडली. हे सोने घेऊन येणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या वतीने अलीकडच्या काळात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त के. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी स्पाईस जेटचे विमान लोहगाव विमानतळावर उतरले. या विमानातून आलेल्या दोन महिला प्रवाशांबाबत अधिकाऱ्यांना शंका आली. त्यांनी या महिलांची चौकशी केली असता, या महिला मुंबई येथील असल्याचे समजले. मुंबई येथील रहिवासी असताना पुणेमार्गे येण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याने या महिलांवरील संशय बळावला. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेल्या साहित्याची व बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यात अधिकाऱ्यांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांकडून त्यांची अंगझडती घेण्यात आल्यानंतर सोने तस्करीचा प्रकार उघड झाला.
दोन्ही महिलांनी सोन्याचे बिस्कीट असलेल्या प्रत्येकी दोन पिशव्या अंगावरील कपडय़ांमध्ये लपवून ठेवल्या होत्या. अंगझडतीमध्ये अशा चार पिशव्या अधिकाऱ्यांना मिळाल्या. प्रत्येक पिशवीमध्ये सोन्याची नऊ बिस्किटे होती. चार पिशव्यांमध्ये सोन्याची एकूण ३६ बिस्किटे सापडली. तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत एक कोटी १३ लाख रुपये आहे.
मागील काही दिवसांपासून लोहगाव विमानतळावर पकडण्यात आलेले तस्करीचे सोने दुबई येथून आणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हे सोने आणण्यासाठी तस्करांनी स्पाईस जेटच्या ठराविक विमानाचा वापर केल्याचे सीमाशुल्क विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुबईहून या ठराविक विमानातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.