पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून शहरातील चौक, गल्ली, रस्ते आणि परिसर हे सामसूम झाले होते. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी करून नियमांचे पालन करणाऱ्या विरोधात कठोर पावलं उचलली आहेत.

लॉकडाउनमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या ४३४ जणांवर संध्याकाळपर्यंत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. दुचाकीवर डबलसीट, विनामास्क, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांसाठी कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण ६९ नाकाबंदीची ठिकाणे असून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे सकाळपासून कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आज पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून उर्वरित ९ दिवस देखील अशाच प्रकारे नागरिकांनी सहकार्य करावे असे, आवाहन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.