भक्तिसंगीत, सुगम संगीत, चित्रपटगीते, दीपोत्सव आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगनगरीतील ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांची संख्या यंदा वाढली असून त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही वाढल्याचे दिसून येते.
पिंपळे निलख येथील राजीव गांधी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तुषार रिठे व आसावरी गोडबोले यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकाहून एक सरस अभंग व भक्तिगीतांनी बुधवारी दिवाळीची पहाट सुंदर झाल्याची भावना उपस्थितांमध्ये होती. संस्थेचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते क्रीडापटू शेखर साठे, कामगार नेते श्रीनाथ कांबळे, शिक्षण मंडळाचे उपसभापति नाना शिवले, सुरेश शिंदे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. गौतम आरकडे, निवृत्ती इंगवले, विजय जगताप, भरत इंगवले उपस्थित होते. अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे पिंपरी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या वतीने चिंचवड भोईरनगरला आयोजित ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या दिवाळी पहाटमध्ये मधुसूदन ओझा, अभिजित वाडेकर, कौस्तुभ दिवेकर, सुजाता जोशी, कविता सिंग, श्रुती शशीधरन, सुमित संत, महेश तामचीकर, सार्थक भोसले यांनी विविध गीते सादर केली. स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेवक गणेश लोंढे, रामभाऊ आव्हाड, राजू गोलांडे, मनोज कांबळे, अॅड. हिम्मतराव जाधव आदी उपस्थित होते. पिंपळे गुरवला राजमाता जिजाऊ उद्यानात चार दिवस दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप मित्र कला मंच आणि राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा समारोप पं. उपेंद्र भट यांच्या कार्यक्रमाने झाला. निगडीतील मॉडर्न शैक्षणिक संकुल व दीपोत्सव सांस्कृितक मंच यांच्या ‘रंग सप्तसुरांचे’ या कार्यक्रमात धनश्री गणात्रा, रवींद्र शाळू, भाग्यश्री अभ्यंकर, सुजाता जोशी, भाग्यश्री गणात्रा यांनी गीते सादर केली. शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, नगरसेविका सुलभा उबाळे, मॉडर्नचे शरद इनामदार आदी या वेळी उपस्थित होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात अंबिका ग्रूपच्या वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट’मध्ये आरती दीक्षित, रोहिणी पांचाळ, संपदा गुरव, पी. चंद्रा, विजय उलपे, मयूरेश वाघ, रवींद्र कांबळे यांनी गीते सादर केली. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. आमदार महेश लांडगे, विजय फुगे, पंढरीनाथ हजारे, प्रकाश डोळस, निवृत्ती फुगे आदी उपस्थित होते. सांगवीतील वेताळ महाराज मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.