पुणे : साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पु. ल. देशपांडे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची दखल आता गूगलने घेतली आहे. पुलंच्या १०१व्या जयंतीनिमित्त ‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात पुलंच्या जीवन आणि कार्याचा वेध घेणारे अनोखे प्रदर्शन समाविष्ट करून गूगलने पुलंना मानवंदना दिली आहे.

पुलंचे जन्मशताब्दी वर्ष (२०१८-१९) नुकतेच झाले, तर रविवारी (८ नोव्हेंबर) पुलंचा १०१वा जन्मदिन आहे. या निमित्ताने गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर विभागातील पुलंविषयीचे खास दालन खुले करण्यात आले आहे. पुलंचे व्यक्तिमत्त्व उलगडणाऱ्या या ऑनलाइन प्रदर्शनासाठी आशुतोष आणि दिनेश ठाकूर यांनी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे आतापर्यंत मराठीजनांनी अलोट प्रेम केलेले पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

गूगलने केलेल्या दालनामध्ये पुलंच्या बहुआयामी योगदानाचा वेध घेण्यात आला आहे. त्याला दुर्मीळ छायाचित्रे, ध्वनिचित्रफितींचीही जोड देण्यात आली आहे. त्यात पुलंचा जन्म आणि त्यांचे आयुष्य, लेखन, त्यांच्या चित्रपट, नाटकांची पोस्टर्स, पुलंनी चित्रपट-नाटकात केलेल्या अभिनयाच्या ध्वनिचित्रफिती, त्यांची काही भाषणे, टपाल तिकीट, तसेच आयुका, मुक्तांगण, आनंदवन अशा संस्थांसाठी केलेले सामाजिक काम अशा वेगवेगळ्या अंगाने हे प्रदर्शन सजवण्यात आले आहे.

काय आहे गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर?

गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर या विभागात दोन हजारांहून अधिक प्रदर्शनांचा समावेश आहे. त्यात महान चित्रकार व्हॅन गॉग, ताजमहाल ते महिलांच्या अधिकाराच्या चळवळीपर्यंत विविध विषय, व्यक्ती यांचा समावेश आहे. त्यात आता पुलंविषयीच्या प्रदर्शनाचाही समावेश झाला आहे.