बारावीच्या परीक्षेसाठी चांगली तयारी करून गेलो होतो; पण वर्गातले सारे तरुण परीक्षार्थी पाहून माझी मलाच खूप लाज वाटली. तसाच बाहेर आलो आणि पत्नीला फोन करून सांगितले की, मी काही पेपर देत नाही. मात्र तिने, काहीही असूदे परीक्षा द्याच, असे अगदी आग्रहाने सांगितले. त्यामुळे पुन्हा पेपर द्यायला गेलो आणि त्या आग्रहामुळेच माझे बारावीचे स्वप्न यंदा ३७ वर्षांनंतर साकारले..
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक गोपाळ चिंतल त्यांचा अनुभव गुरुवारी सांगत होते. त्यांच्या हातातील फाईलमध्ये बारावीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स होती. महापालिकेत एका पत्रकाराने त्यांना विचारले, काय गोपाळराव, कोण होतं बारावीला? त्यावर त्यांचे उत्तर होते, अरे मीच होतो बारावीला..
अकरावी मॅट्रिक बंद होऊन दहावी मॅट्रिकची जी पहिली तुकडी १९७६ मध्ये बाहेर पडली त्यावर्षी चिंतल दहावी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर घरगुती अडचणी आणि परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. दहावीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी महापालिकेच्याच शाळेतून घेतले होते. पुढे प्रपंच, व्यवसाय आणि राजकारणामुळे शिक्षण राहूनच गेले. त्यांचे दोन्ही मुलगे आणि एक मुलगी मात्र उच्चशिक्षित झाली. सूनही उच्चशिक्षित मिळाली. हे चौघेही वेगवेगळ्या शाखांमधील अभियंते आहेत.
मुलगे, मुलगी, सून यांच्याकडे पाहून मलाही नेहमी वाटायचे की आपणही पदवी मिळवायला पाहिजे; पण वेळ होत नव्हता. अखेर गेल्यावर्षी अगदी नेटाने व्हीआयटीमध्ये बारावी कला शाखेत प्रवेश घेतला. वर्षभर अभ्यासही केला. परीक्षेचीही चांगली तयारी केली होती; पण शाहू महाविद्यालयात परीक्षेसाठी गेल्यानंतर वर्गातील तरुण-तरुणी पाहून माझी मलाच लाज वाटली. त्यामुळे पहिला पेपर सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्या वेळी पत्नी सुनीता हिने विश्वास दिला आणि पुन्हा निश्चयाने पेपर द्यायला गेलो. आज मी ५९ टक्के मिळवून बारावी झालो आहे आणि आता पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणार आहे, अशी जिद्द चिंतल यांनी बोलून दाखवली. चिंतल आता ५४ वर्षांचे आहेत आणि घरी नातवाचेही आगमन झाले आहे.