नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिशताब्दी वषार्निमित्ताने महापालिकेतर्फे यंदापासून दरवर्षी उत्कृष्ट संसदपटू  पुरस्कार दिला जाणार आहे. या उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे असेल.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिशताब्दी वर्षांनिमित्त या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली असून पुरस्कारासाठी खासदाराची निवड करण्याचे काम गोखले इन्स्टिटय़ूट या संस्थेतर्फे केले जाणार आहे. तसा पत्रव्यवहारही संस्थेबरोबर झाला असून या महिनाभरात संसदपटूची निवड आणि पुरस्कार प्रदान समारंभ होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
महापालिकेतर्फे ‘नामदार गोपाळ कृष्ण गोखले उत्कृष्ट संसदपटू’ या पुरस्काराने दरवर्षी एका खासदाराचा गौरव केला जाणार आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशीही माहिती महापौरांनी दिली.