एशियन मॅरेथॉनमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय

भारतीय धावपटू गोपी थोनाकल याने चीनच्या डोंगुआन प्रांतात झालेली १६ वी एशियन मॅरेथॉन जिंकत, ही मॅरेथॉन जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा बहुमान मिळवला. थोनाकलने पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.

१९८० मध्ये आशा अगरवाल हिने महिलांसाठीचे पदक जिंकले होते. त्यानंतर प्रथमच एका भारतीयाने ही कामगिरी बजावली आहे. गोपीने दोन तास १५ मिनिटे ४८ सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. उझबेकिस्तानच्या आंद्रे पेत्रोव बरोबर झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीनंतर गोपीने या विजेतेपदावर नाव कोरले. आंद्रेने दोन तास १५ मिनिटे आणि ५१ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत रजत पदक मिळविले. तर मंगोलियाच्या टी. बायंबालेवने दोन तास १६ मिनिटे आणि १४ सेकंदामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.

आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण असल्याचे संस्थेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. गोपीचे कष्ट आणि चिकाटी यांच्या जोरावर हे यश त्याने मिळविले आहे. त्याचे यश आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमधील इतर प्रशिक्षणार्थीसाठी प्रेरणादायी असून या यशामुळे गोपीचा एशियन गेमकडील प्रवास सोपा झाल्याचेही ते म्हणाले.

गोपीचा जन्म २४ मे १९८६ ला केरळमधील शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याला खेळामध्ये रस होता. केरळमध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००९ मध्ये त्याने ११ फील्ड आर्टिलरी रेजिमेंटमध्ये प्रवेश घेतला. २०१२ मध्ये पाच हजार आणि दहा हजार मीटर धावण्याच्या प्रकारातील प्रशिक्षणासाठी त्याने आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेतला. त्याचे कौशल्य ओळखून स्वत: ऑलिंपियन आणि १० हजार मीटर प्रकारातील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या सुरेंदर सिंग यांनी गोपीला मॅरेथॉन प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर गोपीने मुंबई मॅरेथॉन आणि रियो ऑलिंपिकमध्येही उत्तम कामगिरी केली.