एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते संघर्षशील नेता हा गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास कोणीही थक्क व्हावे असाच आहे आणि कार्यकर्त्यांचा नेता बनण्याचा हा प्रवास मुख्यत: पुण्यात घडला आहे. या प्रवासाचा मी साक्षीदार आहे आणि हा प्रवास मुंडे यांच्याबरोबरच करण्याचे भाग्य मला मिळाले. मुंडे यांच्या राजकीय प्रवासाची जडणघडण पुण्यात झालेली आहे. पुण्यात त्यांचा संघाशी संबंध आला, विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय होते आणि पुण्यात ते पतितपावन संघटनेशीही जोडले गेले. मुंडे, मी, अनिल शिरोळे, भीमराव बडदे, जनाभाऊ पेडणेकर अशा आम्ही सर्वानी पतितपावनच्या माध्यमातून त्या वेळी पुणे दणाणून सोडले होते.
मुंडे यांचा खऱ्या अर्थाने जो राजकीय प्रवास सुरू झाला तो १९७४ मध्ये. पुण्यात सर्व विद्यार्थी संघटनांनी मिळून जयप्रकाश नारायण यांना पुण्यात मानपत्र देण्याचा जो कार्यक्रम केला त्यातून त्यांच्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ झाला. जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनाचा तो काळ होता. त्यांना मानपत्र देण्यासाठी जी समिती पुण्यात स्थापन झाली होती, तिचे अध्यक्षपद पुण्यातील सर्व विद्यार्थी संघटनांनी नुकत्याच उदयाला येत असलेल्या मुंडे या तरुण नेतृत्वाला दिले होते. ती त्यांच्या कर्तृत्वाला दिली गेलेली पावती होती. ते सारे प्रसंग मी जवळून पाहिले आहेत.
पतितपावनच्या माध्यमातून काम करताना मुंडे यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे मिळाले. आपली चळवळ बहुजनांपर्यंत पोहोचली पाहिजे याचे भानही त्यांना त्या संघटनेत मिळाले. त्यातून संघर्षशील आणि समाजाला जोडणारा नेता घडला. पुण्यात संघात काम करताना त्यांना वैचारिक बैठक मिळाली. पुढे ती पक्की होत गेली. त्यांचे नेतृत्वगुणही पुण्यातच विकसित झाले. पुढे मुंडे हे भाजपचा चेहरा बनले. बीडचे नेते न बनता ते महाराष्ट्राचे नेते झाले. त्यांची १९९० च्या दशकातील वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्या दशकानंतर शहरी भाजपला ग्रामीण चेहरा प्राप्त झाला, तो मुंडे यांच्यामुळेच. त्यातूनच १९९५ मध्ये युती सत्तेत आली. त्यामागे बाळासाहेब ठाकरे आणि मुंडे हे लोकनेते होते आणि प्रमोद महाजन यांची व्यूहरचना होती. नुकत्याच झालेल्या सत्तापरिवर्तनातही महाराष्ट्रात महायुती घडवून आणण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. त्यातूनच फार मोठे यश या महायुतीला प्राप्त झाले.