करोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नाही असे राज्य सरकार म्हणत असले, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्यासाठीच्या नियोजनाचा आराखडा राज्य शासनासमोर मांडला होता. त्या आराखडय़ात दक्षता घेऊन परीक्षा कशा घेता येतील हे स्पष्ट के लेले असूनही राज्य शासनाने हे नियोजन बाजूला ठेवून परीक्षा न घेण्याचीच भूमिका कायम ठेवली आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेता ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर शैक्षणिकदृष्टय़ा अंतिम वर्ष परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यासाठीची कार्यपद्धतीही जाहीर केली आहे. त्याशिवाय परीक्षा घेण्याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा नकोच अशी राज्य शासनाने भूमिका घेतलेली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याबाबत राज्य शासनाला सादर के लेल्या नियोजनाचा आराखडा ‘लोकसत्ता’ने मिळवला आहे.

यूजीसीने दिलेले निर्देश विचारात घेऊन विद्यापीठाने केलेल्या आराखडय़ानुसार परीक्षेसाठी प्रत्येक वर्गखोली सकाळी नऊ ते दुपारी बारा, दुपारी बारा ते तीन आणि तीन ते सायंकाळी सहा अशा तीन सत्रांत वापरली जाऊ शकते, दोन विद्यार्थ्यांमधील एक आसन रिकामे ठेवून परीक्षा कक्षात ५० टक्के च विद्यार्थी बसवावेत, ५० गुणांच्या प्रश्नपत्रिके साठी दीड तास वेळ असेल, सर्व विषयांची स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जावी, ५० गुणांच्या प्रश्नपत्रिके त ५ गुणांच्या दहा प्रश्नातील कोणतेही सहा प्रश्न सोडवावेत; तसेच दोन गुणांचे दहा प्रश्न असतील, परीक्षेसाठी तीन ते पाच प्रश्नपत्रिकांचे संच तयार करावेत, सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थिनींना पहिल्या दोन सत्रांत बोलवावे अशा तरतुदी या आराखडय़ात करण्यात आल्या आहेत.

संसर्ग टाळण्यासाठीच्या अनेक उपायांचा विचार आराखडय़ात करण्यात आला आहे.

परीक्षांसाठी उपाययोजना

* परीक्षा केंद्रात येण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान मोजावे.

* परीक्षा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे आधी परीक्षा कक्षात प्रवेश द्यावा.

* विद्यार्थ्यांकडून तंदुरुस्तीबाबतचे हमीपत्र घ्यावे.

* प्रत्येक विद्यार्थ्यांने मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करावे.

* मुखपट्टी नसलेल्या विद्यार्थ्यांला प्रवेश देऊ नये.

* प्रत्येक वर्गात सॅनिटायझर ठेवावा.

* प्रत्येक परीक्षा सत्रानंतर लगेचच वर्गाचे सॅनिटायझेशन करावे.