शहरासह जिल्ह्य़ात ३९६ आधार केंद्रे कार्यान्वित

विविध शासकीय कार्यालये, बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३९६ आधार केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक, आचारसंहिता अशी विविध कारणे देत शहरासह जिल्ह्य़ातील अनेक आधार केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नव्हती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरासह जिल्ह्य़ात पुरेशी आधार केंद्रे सुरू असल्याचे बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

चालू वर्षी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात अनेक आधार केंद्रे बंद होती. या काळात महाविद्यालयीन प्रवेश सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला होता. तसेच प्रत्येक शासकीय कामांसाठी, रुग्णालये, विमान प्रवास अशा विविध कारणांसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणीपेक्षा आधार कार्डवरील वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, छायाचित्र अशा विविध दुरूस्त्यांसाठी नागरिकांची आधार केंद्रांवर गर्दी होत असते. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार केंद्रे पूर्ववत करण्यात येतील, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शहरासह जिल्ह्य़ात ३९६ केंद्रे सुरू आहेत.

दरम्यान, खासगी जागेत आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे सुरू असलेली सर्व आधार केंद्रे शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात आली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये, कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट), पुणे महापालिकेचे करसंकलन केंद्र, जिल्ह्य़ातील तहसील कार्यालये, नगरपालिका, पंचायत समिती अशा विविध शासकीय कार्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.सद्य:स्थितीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांमध्ये मिळून १५०, बँकांमध्ये १०० आणि टपाल कार्यालयांमध्ये १३६ अशी शहरासह जिल्ह्य़ात ३९६ आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

‘बीएसएनएल’ कार्यालयातही आधार केंद्र

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) भारतीय संचार निगम लिमिटेडला देखील (बीएसएनएल) त्यांच्या कार्यालयात आधार केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चालू महिन्यापासून शहरातील मॉडेल कॉलनी, धनकवडी आणि चिंचवड येथील डीजीएम ऑफिस येथे प्रत्येकी एक अशी तीन केंद्रे सुरू झाली आहेत.