‘सध्या इंग्रजी शिकणं हेच प्रगतीचं हत्यार मानलं जात आहे. ब्रिटिशांच्या काळात एवढे दिले नसेल तेवढे आपण इंग्रजी शिक्षणाला महत्त्व दिले.गरिबांना खासगी संस्थेतील शिक्षण परवडत नाही. सरकारी शाळांची गुणवत्ता वाढणे आवश्यक असून येत्या दोन वर्षांत सरकारी शाळांमधील चित्र पालटेल,’ असे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी सांगितले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण माध्यमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्र.ल.गावडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुध्दे, उपाध्यक्ष संजय इनामदार, सचिव डॉ. संतोष देशपांडे, उपसचिव भरत व्हनकटे, मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर आदी उपस्थित होते. या वेळी जावडेकर म्हणाले, ‘शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे हत्यार आहे. प्राथमिक शिक्षणापासूनच त्याची पायाभरणी होते. देशातील २३ कोटी विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेतात. यापकी १३ कोटी सरकारी तर १० कोटी खासगी संस्थेत शिकतात. मात्र, सध्या सरकारी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट होत असून खासगी संस्थेत शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण व्यस्त करण्यासाठी सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे. चांगल्या, गुणवत्तापूर्ण शाळांनीही त्यासाठी पुढाकार घेऊन आपल्या परिसरातील किमान दोन शाळांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणे गरजेचे आहे.संशोधनात देशाला पुढे न्यायचं काम करायचं आहे. यासाठी चांगली केंद्र तयार करणे, गुणवत्ता वाढविण्याचे केंद्राचे धोरण आहे.’