विद्याधर कुलकर्णी

मूळचे पाश्चात्त्य बनावटीचे पण, नाटय़संगीताच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृतीशी एकरूप झालेल्या ऑर्गन या वाद्याचे जतन करण्यासाठी उमाशंकर ऊर्फ बाळा दाते यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना राज्य शासनाचे पाठबळ मिळाले आहे. ऑर्गन निर्मिती करणारे जगभरातील एकमेव अशी दाते यांची ओळख आहे.

शालेय शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन दाते यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच विद्या प्राधिकरण येथे प्रतिनियुक्ती केली आहे. दाते हे सध्या कोकणातील आडिवरे (जि. रत्नागिरी) येथील राजाराम हायस्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तावडे यांनी आडिवरे येथील बाळा ऑर्गन अँड म्युझिकल्स या ऑर्गन आणि संवादिनी निर्मिती कारखान्याला भेट दिली होती. दाते हे सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचे काम करीत असून शासन म्हणून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल, अशी ग्वाही तावडे यांनी दिली होती. त्यानुसार दाते यांची विद्या प्राधिकरणावर प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, तावडे यांनी ‘आयआयटी मुंबई’ येथील  धातुशास्त्र संशोधन विभागातील अधिकाऱ्यांची भेट घडवून आणली.

दाते म्हणाले, रीड ऑर्गन या वाद्याची १८१० मध्ये फ्रान्समध्ये निर्मिती झाली त्या वेळी तो दाब तत्त्वावर वाजत होता. त्यानंतर १८३५ मध्ये ‘सक्शन मेथड’वर वाजणारा ऑर्गन बनविण्यात आला. अमेरिकेत या वाद्याच्या तंत्रज्ञानात संशोधन होऊन अनेक आमूलाग्र बदल होत गेले. रीड हा ऑर्गनमधील पाठीचा कणा मानला जातो. अमेरिकेत १९५० च्या सुमारास ऑर्गनच्या रीडचे उत्पादन बंद झाले. त्यामुळे जगभरात उपलब्ध असलेल्या जुन्या ऑर्गनच्या रीडचा वापर करूनच ऑर्गनची निर्मिती केली जाते. बाळा ऑर्गन अँड म्युझिकल्सतर्फे गेल्या काही वर्षांत ९० ऑर्गनची निर्मिती करण्यात आली आहे. आता जेमतेम ३० रीड उपलब्ध असून तेवढय़ा ऑर्गनची निर्मिती झाल्यानंतर हे काम थांबेल. असे होऊ नये यासाठी धातुशास्त्रामध्ये संशोधन करून नवीन रीडची निर्मिती करण्याचा मानस आहे. आता सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतल्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.