महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे याचे भाजप व त्यांचे सहकारी उदात्तीकरण करीत आहेत. गोडसेचा पुतळा उभा करण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्वावर भाजपचे नेते काही बोलत नाहीत. याचा अर्थ नथुराम गोडसे उदात्तीकरणाला सरकारचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
नथुराम गोडसे उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर मूक आंदोलन करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. खासदार वंदना चव्हाण, आमदार दिलीप वळसे-पाटील, महापौर दत्ता धनकवडे, म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, माजी महापौर चंचला कोद्रे, नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
सरकारच्या धोरणाबाबत पवार म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने नद्यांच्या काठावर उद्योगांच्या उभारणीस परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या सरकारने मात्र सर्रासपणे नदीकाठी उद्योगांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. टोल व एलबीटीच्या प्रश्नांपासूनही सरकार पळ काढत आहे.
‘मेट्रोला उशीर म्हणूनच तुम्हाला निवडले’
पुण्यातील मेट्रोबाबत अजित पवार म्हणाले, भूमिगत मेट्रो होण्याबाबत आमची भूमिका होती, पण तज्ज्ञांच्या मतानुसार त्याचा खर्च परवडणारा नव्हता. सध्याचे सरकारही त्याच मुद्दय़ावर मेट्रोला उशीर करते आहे. जुन्या सरकारने मेट्रोला उशीर केल्याचा आरोप सरकार नेहमीच करते. आम्ही मेट्रोला उशीर केला म्हणून तर लोकांनी तुम्हाला निवडून दिले. आता तुम्हीही उशीर करू नका. मेट्रो लवकर मार्गी लावा.