स्वप्न बघायचं कोणी काही कारण नाही, हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल असा विश्वास महाविकासआघाडी सरकारमधील कॅबिनेटमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करावं लागणार नसल्याचं म्हटलं होतं. यावर उत्तर देताना वळसे पाटील यांनी मंच येथे पत्रकारांशी बोलत असं विधान केलं.
महाविकास आघाडीच्या सरकारला खाली खेचण्याचा कुठलाही प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा नाही. आमचा पक्ष प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करेल. या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करावं लागणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
त्यांच्या या विधानाला वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. स्वप्न बघायचं कोणी काही कारण नाही, हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालेल अशी खात्री आहे. महाविकासआघाडीतील जे नेते नाराज असतील त्यांची नाराजी वरिष्ठ नेते दूर करतील काळजी करायचं कारण नाही, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
उद्योग व कामगार यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टीने काम केलं जाणार आहे. स्थानिक कामगारांना काम मिळालं पाहिजे. उद्योजकांचे उत्पन्न कसं वाढेल व कामगारांना कसा न्याय मिळेल हे पाहिले जाणार आहे. आर्थिक मंदीच सावट देशभर असल्यामुळे उद्योग क्षेत्रासमोर काही समस्या आहेत. त्या देखील सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2020 7:22 pm