जनतेमध्ये भ्रष्टाचाराबाबत प्रचंड राग असून हा राग केवळ राजकीय व्यक्तींविरुद्धच नव्हे, तर नोकरशाहीविरुद्धही आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काम करताना याची जाणीव ठेवावी, असे आवाहन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. जनतेच्या शासन व सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असतानाच नोकरशाहीवरही त्याची जबाबदारी असते, असेही ते म्हणाले.
राज्य शासनाच्या विविध सेवेत दाखल झालेल्या वर्ग एक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिराचे यशदा येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपालांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, यशदाचे महासंचालक संजय चहांदे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी त्या वेळी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांसाठी अशाप्रकारे पहिल्यांदाच एकत्रित प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याबद्दल राज्यपालांनी राज्य शासन व यशदाचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, प्रशिक्षणानंतर अधिकाऱ्यांमध्ये शासनाच्या सेवेत काम करताना आवश्यक असणारे कौशल्य, नेतृत्व गुण आणि सांघिक भावनेने काम करण्याच्या वृत्तीचा विकास होईल. प्रशिक्षणामुळे अधिकाऱ्यांचे एक जबाबदार आणि विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या अधिकाऱ्यांत रूपांतर होईल.
अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, तुमच्याकडे येणारी प्रत्येक फाईल गरीब आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाशी निगडित असणारी असेल. गरिबाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची संधी आणि अधिकार तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमच्यावर काही वेळा दबाव येण्याचीही शक्यता आहे. अशा वेळी निर्णय घेताना सद्सद्विवेकबुद्धीच्या आधारे निर्णय घ्या. जनतेच्या अपेक्षापूर्तीची जबाबदारी नोकरशाहीवरही आहे. त्यामुळे विविध सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी  पेलण्यास सज्ज व्हावे.
प्रधान सचिव सहाय यांनीही या वेळी भाषण केले. संजय चहांदे यांनी प्रास्ताविक केले. नरेश झुरमुरे यांनी आभार मानले.