स.प. महाविद्यालयाला अकरावीसाठी प्रवेश क्षमता वाढवून न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अकरावीला प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, त्या ठिकाणी प्रवेश देण्याचे अकरावी केंद्रीय समितीने शनिवारी निश्चित केले आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बुधवारी होणार आहे.
स. प. महाविद्यालयाचा अकरावीला प्रवेश क्षमता वाढवून मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश न घेता स. प. महाविद्यालयामध्येच प्रवेश मिळावा असा हट्ट धरून बसलेल्या विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, तेथेच प्रवेश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स. प. महाविद्यालयाचा अतिरिक्त प्रवेश क्षमतेचा प्रस्ताव फेटाळल्याचे पत्र शनिवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला मिळाले. त्यानंतर अकरावी केंद्रीय प्रवेश समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून मिळालेला प्रवेश रद्द करून स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता, त्या विद्यार्थ्यांना बुधवारी (२० नोव्हेंबर) प्रवेश देण्यात येणार आहेत. आबासाहेब गरवारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता प्रवेश प्रक्रिया होणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी दहावीची मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा मूळ दाखला आणि त्याच्या साक्षांकित प्रती आणाव्यात ,असे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे कळवण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्यांना महाविद्यालय बदलून देण्यात येणार नाही, असेही समितीने कळवले आहे.
मुख्य सचिवांकडून कौतुक
राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे कौतुक केले आहे. शिक्षण विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने बांठिया यांची भेट घेतली होती. त्या वेळी बांठिया यांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया चांगली राबवल्याबद्दल विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे आणि शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांचे कौतुक केले. शिंदे यांना मुख्य सचिवांकडून स्वतंत्र पत्रही पाठवण्यात आले आहे.