‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षा मोठा पुतळा बांधण्याचे ठरवले जाते. पण राजगड किंवा रायगडासारखे किल्ले मात्र शासनाला उभे करता येत नाहीत. शिवरायांची तत्त्वे राजकारण्यांनी थोडी जरी अमलात आणली असती, तरी राज्याचे रूप पालटू शकले असते,’ असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी व्यक्त केले.
‘स्व’- रूपवर्धिनी आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे बेडेकर यांना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे आणि विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते बेडेकर यांना ‘स्वामी विवेकानंद मातृभूमी गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी बेडेकर बोलत होते.
स्वातंत्र्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी देशाचे तुकडे करून येथे ऐक्य निर्माण होऊच दिले नाही, असे बेडेकर यांनी सांगितले. नवीन पिढीबद्दल ते म्हणाले, ‘‘अनेक तरुण मुले माझ्याकडे मोडी, फारसी शिकण्यासाठी, इतिहास अभ्यासक बनण्याची इच्छा घेऊन येतात. या मुलांनी संशोधक वृत्तीने काम जरूर करावे, परंतु आर्थिक स्थैर्य मिळवल्यानंतरच या अभ्यासात झोकून द्यावे.’’
डॉ. अभ्यंकर म्हणाले, ‘‘आज आपण पारतंत्र्यात नसलो, तरी आजचे तरुण परदेशी शास्त्राला बांधले गेले आहेत. स्वत:च्या संस्कृतीबद्दल माहिती आहे; पण ज्ञान शून्य अशी आजची अवस्था आहे. हिंदूंसारखा एकत्र न येणारा समुदाय दुसरा नाही. मानवतेच्या कल्याणासाठी राष्ट्राची उभारणी करणे आवश्यक असून त्यासाठी हिंदूंचे संघटन गरजेचे आहे.’’
बेडेकर यांनी आपल्या कार्यातून मराठी मनाला प्रेरणा आणि ऊर्जा दिल्याचे डॉ. गावडे यांनी सांगितले.