स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) सुरू असलेला व्यापाऱ्यांचा बंद बुधवारी आठव्या दिवशाही सुरूच राहिला. या प्रश्नी तोडगा निघेपर्यंत बंद सुरूच ठेवण्याच्या आपल्या निर्णयावर व्यापारी ठाम असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. दरम्यान, या बंदचा सामना करण्यासाठी आता प्रशासनही सज्ज झाले असून, किराणा दुकाने बंद असल्याने धान्यविक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या.
शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता यावी यासाठी त्यांना गुलटेकडी मार्केट यार्ड, शिवाजीनगर धान्य गोदाम अशा मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्ह्य़ाधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत कृषी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या विक्री व्यवस्थेद्वारे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडूनच धान्य खरेदी करता येईल.
‘व्यापार परवाने जमा नाहीत’
सरकारने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देताना आपले व्यापार परवाने परत करणार असल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले होते. व्यापाऱ्यांनी परवाने परत केल्यास त्यांच्याकडील धान्यसाठा बेकायदेशीर आणि काळाबाजार ठरत असून त्यांच्यावर धान्यसाठा जप्तीची कारवाई करता येणार असल्याची तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली होती. मात्र अद्याप व्यापाऱ्यांनी आपले व्यापार परवाने परत केले नसल्याची माहिती धान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळे यांनी दिली आहे.
व्यापाऱ्यांची महाआरती
सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिर तसेच गुलटेकडी मार्केट यार्ड आणि दत्तनगर येथील मंदिरांमध्ये व्यापाऱ्यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता येथे एलबीटीविरोधातील पत्रकेही वाटण्यात आली.
 पिंपरीत व्यापाऱ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या
एलबीटीच्या विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मॉलचालकांना करण्यासाठी गेलेल्या खासदार गजानन बाबर व पोलिसांमध्ये बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी बाबर यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले.
मॉलचालक व बहुतांश व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होत नसल्याने आंदोलनाला यश मिळत नाही, अशी आंदोलकांची खंत आहे. बुधवारी बाबर यांनी चिंचवड मॉलला जाऊन बंदचे आवाहन केले, तेव्हा पोलिसांनी अटकाव केला. पोलीस परवानगीविना बाबर यांनी मंगळवारी मोर्चा काढला होता. या प्रकरणी त्यांना बुधवारी अटक करून चिंचवड ठाण्यात आणण्यात आले. तिथे पोलीस ठाण्यातच व्यापाऱ्यांनी ठिय्या मारला. भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवार, नगरसेवक सीमा सावळे, गोविंद पानसरे, सारंग कामतेकर आदी त्यात सहभागी झाले होते. दरम्यान, व्यापाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे. ग्राहकांना वेठीस धरल्यास त्याचा उद्रेक होईल व जनता रस्त्यावर येईल, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी केले आहे.