पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या केंद्रांची विभागणी करताना त्रुटी

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या केद्रांची विभागणी करताना त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आले आहे. पदवीधर आणि शिक्षक असलेल्या मतदारांसाठी एकाच केंद्रावर मतदान करण्याची व्यवस्था करण्याऐवजी अनेकांना दोन वेगवेगळी केद्रे देण्यात आली आहेत. तसेच काही मतदारांना घरापासून किमान १६ किलोमीटरच्या परिसरातील मतदान केंद्र दिले असल्याने मतदानाच्या टक्के वारीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिक्षक असलेल्या मतदारांची नावे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघांमध्ये आहेत. अशा मतदारांची मतदानाची व्यवस्था एकाच केंद्रावर करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणूक शाखेकडून केंद्रांची विभागणी करताना गोंधळ झाला आहे. शिक्षक असलेल्या मतदारांना दोन वेगवेगळी केंद्र देण्यात आली आहेत. मतदारांना घराजवळील मतदान केंद्र देणे आवश्यक आहे. मात्र, मतदारांसाठी केंद्र देताना किमान १६ कि.मी. अंतरावरील कोणतेही केंद्र देण्याचे निश्चित करून निवडणूक शाखेने केंद्रांचे वाटप के ले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना घरापासून दूर अंतरावरील केंद्र आली आहेत. याचा परिणाम मतदानाच्या टक्के वारीवर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या मतदार संघांसाठी यापूर्वी १२०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असायचे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ५०० ते ७०० मतदारांसाठी एक केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पदवीधर मतदार संघात ५८९ मतदारांसाठी एक आणि शिक्षक मतदार संघासाठी २५८ मतदारांमागे एक मतदान केंद्र आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२०२ मतदान केंद्र असून पदवीधर मतदार संघामध्ये ८३५ आणि शिक्षक मतदार संघात ३६७ मतदान केंद्र झाली आहेत. मात्र, केंद्रांची विभागणी करताना मतदारांना दूरवरची आणि दोन वेगवेगळी केंद्र आली आहेत.

बनावट मतदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

करोनाच्या पार्श्वभूमीवर बनावट मतदान होऊ नये, याकरिता प्रशासनाने खबरदारी घ्यावी. बनावट मतदार असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.