पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी धारकांचीही मोठी संख्या; ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह’च्या पाहणीतील माहिती

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ५४२ खासदारांपैकी ३९४ खासदार किमान पदवीधर आहेत. तर जेमतेम बारावीपर्यंत शिकलेल्या खासदारांचे प्रमाण २७ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभेच्या कामकाजाचा अभ्यास करणाऱ्या ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह’ या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही माहिती समोर आली. २०१४ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांपैकी २० टक्के खासदार बारावीपर्यंत शिकलेले होते. या निवडणुकीत जेमतेम बारावीपर्यंत शिकलेल्या खासदारांच्या प्रमाणात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

निवडून आलेल्या ५४२ खासदारांपैकी ३९४ खासदार पदवीधर आहेत, तर २५ टक्के खासदारांकडे पदव्युत्तर पदवी आहे. तसेच ४ टक्के खासदारांनी पीएच.डी. पूर्ण केलेली आहे. १९९६ पासून लोकसभेतील किमान ७५ टक्के खासदार पदवीधर असल्याचे या पाहणीत नमूद करण्यात आले आहे.

लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील डॉ. सुभाष भामरे, डॉ. सुजय विखे, डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. हिना गावित, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. श्रीकांत शिंदे हे सहा खासदार डॉक्टर आहेत. त्यातील चार खासदार तज्ज्ञ डॉक्टर असून, दोन खासदार एमबीबीएस आहेत.

महिलांचा टक्का वाढला

लोकसभा निवडणुकीत एकूण ७१६ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यातील ७८ महिला विजयी झाल्या. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतून ६२ महिला खासदार झाल्या होत्या. तर पहिल्या लोकसभेत महिला खासदारांचे प्रमाण १४ टक्के होते. गेल्या काही वर्षांत महिला खासदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.

३०० खासदार नवे

लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांमध्ये ३०० उमेदवार पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. गेल्या लोकसभेत हे प्रमाण ३१४ होते, तर १९७ खासदार पुन्हा निवडून आले आहेत. निवडून आलेल्या खासदारांपैकी १२ टक्के खासदारांचे वय ४० हून कमी आहे. या खासदारांचे वय २५ ते ४० दरम्यान आहे. गेल्या वेळी हे प्रमाण ८ टक्के होते.