लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी गेली काही वर्षे कार्यरत असलेल्या पाच ज्येष्ठ कार्यकर्त्यांची धान्यतुला करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत हे धान्य पोहोचवून त्यांना मदतीचा हात देण्याचा संकल्प युवा कार्यकर्त्यांनी सिद्धीस नेला.
ज्येष्ठ शिल्पकार डी. एस. खटावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे भाई कात्रे या कार्यकर्त्यांची शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे धान्यतुला करण्यात आली. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांच्या कार्याचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त मकरंद रानडे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, अॅड. प्रताप परदेशी, इक्बाल दरबार, मंडळाचे अध्यक्ष तन्मय तोडमल, विक्रांत मोहिते, राजेश भोर, गणेश सांगळे, अमित देशपांडे आणि वैभव वाघ या वेळी उपस्थित होते.
रानडे म्हणाले, शहरातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून धान्यतुलेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मानवसेवेचे मंदिर उभारणाऱ्या मंडळांनी असे उपक्रम राबविणे सातत्याने सुरू ठेवावे. वैभव वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.