मुलीच्या मनाविरुद्ध विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांची तक्रार मुलीने आजीकडे केली. आजीने सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या नातीचा बालविवाह थांबविला. सोमाटणे फाटा येथील एका गुरुद्वारात शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील विकासनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध पालकांनी दापोडीतील एका मुलासोबत ठरविला होता. मुलीच्या लग्नाची पत्रिकाही छापली होती. मात्र, मुलीला विवाह करायचा नसल्याने तिने तिच्या आजीकडे याबाबत तक्रार केली. मुलीची आजीने चाईल्ड लाईन संस्थेच्या सदस्य असलेल्या डॉ. यामिनी अद्वैत आडबे (वय ४८, रा. बालेवाडी फाटा बाणेर) यांच्याकडे तक्रार केली. मुलीचा अल्पवयीन असल्याचा दाखला आणि लग्नपत्रिका सादर केली. डॉ. आडबे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन देहूरोड पोलिसांना घटनेची माहिती दिली. देहूरोड येथील एका गुरुद्वारामध्ये हा विवाह होणार होता. पण, याबाबत तक्रार झाल्याची माहिती मुलीच्या पालकांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी ऐन वेळी ठिकाण बदलून सोमाटणे फाटा येथील गुरुद्वारात विवाह कार्यक्रम आयोजित केला होता. पण, डॉ.आडबे यांनी नवे ठिकाणही शोधून काढले. अल्पवयीन विवाह थांबविला. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुला-मुलीचे पालक व मध्यस्थाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.