सख्ख्या भावांसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन तंटय़ातून आजोबांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीत घडली. नातवावरील अतीव प्रेमामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दहा वर्षांच्या नातवाचा गळा दाबून खून केला. आत्महत्या करण्यापूर्वी आजोबांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. ‘दुकानाबाबत सख्ख्या भावाबरोबर शिरूर येथील न्यायालयात सुरू असलेल्या वादातून आत्महत्या करत आहे. लाडक्या नातवाला सोडून राहू शकत नसल्यामुळे त्याला बरोबर घेऊन निघालो आहे. आयुष्यभर कोर्ट-कचेऱ्या करायच्या नाहीत, त्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले’ असे आजोबांनी या चिठ्ठीत नमूद केले आहे.
जिनय परेश शहा (वय १०, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे खून झालेल्या नातवाचे नाव आहे. तर सुधीर दगडूमल शहा (वय ६५) असे आत्महत्या केलेल्या आजोबांचे नाव आहे. सुधीर यांचा मुलगा परेश याने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.
शहा कुटुंबीय मूळचे शिरूरमधील आहे. तेथे त्यांची जमीन आहे. सुधीर शहा यांना पाच भाऊ आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात दुकानाच्या ताब्यावरून शिरूर न्यायालयात वाद सुरू आहे. शांतीनगर सोसायटीत शहा कुटुंबीयांनी दोन महिन्यांपूर्वी सदनिका विकत घेतली. शुक्रवारी (१८ मार्च) सोसायटीची निवडणूक होती. सुधीर यांचा मुलगा परेश रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील निवडणुकीचे काम संपवून घरी आला. परेश, त्याची पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी जारवी हे शयनगृहात झोपले होते. तर सुधीर आणि त्यांचा नातू जिनय हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुधीर यांनी जिनय याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह इमारतीच्या जिन्यातील पायरीवर ठेवला.
सोसायटीचा रखवालदार रिंकू पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी आला होता. त्याच वेळी सोसायटीतील एका रहिवाशाने आवारात कोणीतरी पडल्याचे पाहिले. रहिवाशांमध्ये चर्चा सुरू झाल्याने परेश यांनी सातव्या मजल्यावरून खाली डोकावून पाहिले. तेव्हा वडील सुधीर हे खाली पडल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, सुधीर यांच्याशेजारी झोपलेला जिनय बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. जैन यांच्या शेजारी राहणाऱ्या महिला जिन्यावरून खाली निघाल्या होत्या. तेव्हा जिनय हा बेशुद्धावस्थेत पायरीवर पडल्याचे त्यांना दिसले. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोसायटीत खळबळ उडाली. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त रवींद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिनय आणि त्याचे आजोबा सुधीर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच ते दोघे जण मरण पावले होते.
सुधीर यांची विवाहित मुलगी सिंगापूर येथे राहायला आहे. त्यांची पत्नी पौर्णिमा या मुकुंदनगर येथे भावाकडे राहायला गेल्या होत्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर शांतीनगर सोसायटीत शोककळा पसरली.
…………….
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सुधीर यांनी लिहिलेली चिठ्ठी (सुसाइड नोट) जप्त करण्यात आली. ‘माझे वय पाहता भावांसोबत मी आयुष्यभर कोर्ट-कचेऱ्या करू शकत नाही. जिनय हा माझा लाडका नातू आहे. त्याला सोडून मी राहू शकत नाही. जिनयला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. त्याला माझ्याबरोबर घेऊन जात आहे. माझ्या कृत्यास कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे सुधीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.