द्राक्ष, डाळिंब आणि आंब्यांची उच्चांकी निर्यात
पिकविलेला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांच्या तावडीत सापडल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विषय चर्चिला जात असतानाच दुसरीकडे जगाचा वेध घेत महाराष्ट्रातील अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीतही द्राक्ष, डाळिंब व आंब्याची निर्यात यंदाच्या वर्षी तिपटीवर नेली आहे. कृषी उत्पन्न निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. दलालांच्या कचाटय़ातून सुटून थेट जगाच्या बाजाराचा वेध घेणाऱ्या अनेक उत्पादकांचा या निर्यातीमध्ये वाटा आहे.
द्राक्षाच्या निर्यातीने यंदा नवा उच्चांक स्थापन केला आहे. मागील वर्षी २९२० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा हा आकडा तब्बल सात हजार कंटेनरवर गेला आहे. महाराष्ट्रातून प्रामुख्याने जर्मनी, इंग्लंड, रशिया, बांगलादेश, चीन, युरोपमध्ये द्राक्षाची निर्यात केली जाते. यंदा प्रथमच कॅनडातही द्राक्षाची निर्यात करण्यात आली. राज्यात सुमारे तीन लाख हेक्टरवर द्राक्षाचे उत्पन्न झाले. त्यातील निम्मे उत्पन्न नाशिकमधील आहे. वाढलेल्या निर्यातीबाबत द्राक्ष उत्पादक असोसिएशनचे माणिकराव पाटील यांनी सांगितले, की द्राक्षाचा हंगाम यंदा एक महिना आधीच सुरू झाला होता. त्यामुळे उत्पादन वाढले. त्याचप्रमाणे चिली व दक्षिण अफ्रिकेतील द्राक्ष उत्पादन घटल्याने व द्राक्ष खराब असल्याने महाराष्ट्रातील निर्यातीला चांगला वाव मिळाला.
डाळिंबाची निर्यात मागील वर्षी सुमारे २० हजार टनांची होती. यंदा ती ४० हजार टनावर पोहोचली आहे. राज्यात चाळीस हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड झाली होती. युरोपसह, श्रीलंका व बांगलादेशात राज्यातून डािळब पाठविण्यात आले. यंदा अमेरिकेतही प्रथमच महाराष्ट्राचा डाळिंब गेला. ही निर्यात आणखी वाढण्यास वाव असल्याचा विश्वास डाळिंब उत्पादन व संशोधन असोसिएशनचे सचिव प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केला.
आंब्यालाही यंदा निर्यातीत चांगले दिवस आले आहेत. २०१२- १४ पर्यंत हापूसला युरोपियन युनियनने बंदी केली होती. त्याचप्रमाणे मागील वर्षी आंबा खराब झाल्याने निर्यात घटली होती, मात्र यंदा हापूसच्या निर्यातीत सुमारे ४० टक्के वाढ झाली असून, युरोपियन युनियनला पाच हजार मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.
बहुतांश शेतकऱ्यांनी निर्यातदारांच्या माध्यमातून फळांची थेट निर्यात केली असून, बाजार समितीतून खरेदी करूनही निर्यात झाली आहे. मात्र, थेट निर्यात करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काळातही जागतिक बाजारपेठ लक्षात घेऊन फळांची निर्यात वाढविण्यावर भर राहणार असल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.