वन विभागाकडे निर्णय विचाराधीन
माळढोक अभयारण्याच्या आजूबाजूच्या गवताळ प्रदेशातील शेतकऱ्यांनी उसाऐवजी माळढोकाला सुसंगत ठरतील, अशी पिके घ्यावीत यासाठी त्यांना नुकसानभरपाई देण्याचा वन विभागाचा विचार आहे. गेल्या वीस वर्षांत गवताळ भागात विनाकारण लावलेली ग्लिरिसिडियासारखी झाडे काढून टाकण्याचा प्रयोगही विभागाने केला असून ठरावीक ठिकाणची झाडे काढल्यावर गवत वाढते आणि तिथे माळढोक दिसू लागतो, असेही निदर्शनास आले आहे.
गवताळ प्रदेश वाचवण्यासाठीच्या उपायांबाबत ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केलेल्या अभ्यासाचा अहवाल ‘लोकसत्ता’ला प्राप्त झाला आहे. पुण्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये आणि बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’च्या परिसंस्थाशास्त्र केंद्राच्या डॉ. कविता ईश्वरन व मनाली राणे यांचा या अभ्यासात सहभाग आहे.
गवताळ प्रदेशांमध्ये राखीव प्रदेशासह चराऊ राने आणि शेतीखाली असलेला प्रदेश एकत्रितपणे असल्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी वेगळ्या प्रकारे विचार करायला हवा, असे या अहवालात म्हटले आहे. शेतक ऱ्यांनी गवताळ प्रदेशातील पशूपक्ष्यांच्या प्रजातींना योग्य ठरतील, अशी पिके लावावीत यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून शेतीतील संभाव्य नुकसानीसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई देणे, शेतक ऱ्याने अधिक नफा मिळवून देणाऱ्या पिकाऐवजी प्रदेशाला सुसंगत पीक लावले, तर त्याला नफ्यातील फरक देणे, शेतीची जमीन लीजने घेऊन ती मोकळी सोडणे असे पर्याय चर्चेत आहेत.
लिमये म्हणाले, ‘उघडे गवताळ प्रदेश व ज्वारी-बाजरीसारख्या पिकातून माळढोक फिरू शकतो परंतु उसासारख्या पिकातून तो जाऊ शकत नाही. शेतक ऱ्यांना एकरी ठरावीक पैसे नुकसानभरपाई देऊन गवताळ प्रदेशातील शेतीत विशिष्ट पिके घेण्यासाठी जनजागृती करता येईल. ऑक्टोबरनंतर या अहवालातील सूचनांवर शिक्कामोर्तब होणार असून नंतर नुकसानभरपाई किती असावी यांसारख्या मुद्दय़ांबाबत धोरणे ठरतील.’
‘माळढोक पळत जाऊन उडण्यासाठी झेप घेत असल्यामुळे त्याला मोकळा प्रदेश हवा असतो. त्यामुळे काही निवडक ठिकाणची झाडे सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने काढली गेली. अशा जागी गवत वाढते तसेच तिथे धान्य पेरल्यास किडे खायला माळढोक येतो हे लक्षात आले. गवताळ भागातच कोल्हा, लांडगा व तरस हे प्राणीही असल्याने त्यांना लपण्यासाठी सर्व झाडे काढली जात नाहीत. हा प्रयोग कुठे-कुठे राबवावा हेही ऑक्टोबरनंतर ठरवले जाईल,’ असेही लिमये यांनी सांगितले.
मादी माळढोकालाही ट्रान्समीटर बसवणार
सध्या राज्यात ६ ते ८ माळढोक पक्षी अधूनमधून दिसत असून सोलापूर, कर्नाटक सीमा, अहमदनगर,वरोरा हा परिसर त्यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. एका नर माळढोकाला वन विभागाने ट्रान्समीटर बसवल्यानंतर आता गंगेवाडीत दिसणाऱ्या मादी माळढोकालाही ऑगस्टनंतर ट्रान्समीटर बसवणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. मादी माळढोक नरापेक्षा आकाराने लहान व कमी वेळा दृष्टीस पडत असल्याने माळढोकांच्या विणीच्या हंगामात तिचा माग ठेवता येणे विशेष बाब ठरेल.