करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी परदेश प्रवास करून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक १४ दिवसांचे संपूर्ण स्व-विलगीकरण पूर्ण करत असतील, या काळात त्यांना विषाणूजन्य आजाराची लक्षणे नसतील, तर त्यांना १४ दिवसांनंतर कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घरी स्व-विलगीकरणासाठी राहिलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात परदेशातून आलेले, त्यांच्या संपर्कात आलेले तब्बल १७,१५१ नागरिक होम क्वारंटीन पाळत आहेत. ९६० व्यक्तींना रुग्णालये किंवा अन्य ठिकाणी आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले आहे.   राज्याचे निवृत्त वैद्यकीय महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, ज्या नागरिकांना होम क्वारंटीन सांगण्यात आले आहे, ते रुग्ण किंवा संशयित नाहीत. मात्र, कदाचित ते विषाणूचे संभाव्य वाहक असू शकतात. ही शक्यता गृहित धरून,  त्यांनी १४ दिवस वेगळे राहायचे आहे. १४ दिवसांत त्यांना कोणतेही लक्षण न दिसल्यास त्यांनी चाचणीचा आग्रह धरू नये.

१४ दिवस महत्त्वाचे..

स्व-विलगीकरणाच्या काळात घरातील इतर व्यक्तींचा सहवास टाळणे, स्वतच्या वापरातील वस्तूंची वारंवार स्वच्छता ठेवणे ही खबरदारी आवश्यक आहे. विषाणूबाधा असल्यास १४ दिवसांमध्ये लक्षणे दिसतात. त्यामुळे या काळात सर्दी, खोकला, ताप यांपैकी काहीही लक्षण आढळले तर त्या व्यक्तीचे निदान केले जाते. हे १४ दिवस नीट पार पडले असता या व्यक्तीने काळजी करायचे कोणतेही कारण नाही. त्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणीची देखील गरज नाही.  या कालावधीनंतर होम क्वारंटीन असलेले नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करू शकतात, असे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.