खडकवासला धरणातील गाळ काढण्याची ‘ग्रीन थम्ब’ या संस्थेची मोहीम आणि आता त्यात गणेश मंडळांनी घेतलेला सहभाग यामुळे धरणातील गाळ तर निघत आहेच, शिवाय तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे जलाशयाभोवती होणाऱ्या अतिक्रमणांवर आपोआपच लक्ष ठेवले जात आहे. या दोन्ही बाबतीत या मोहिमेचे सकारात्मक परिणामही आता दिसू लागले असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे शहराला पाणी पुरवणाऱ्या प्रमुख चार धरणांमध्ये खडकवासल्याचा समावेश होतो. त्यात साचलेला गाळ काढण्याची मोहीम ‘ग्रीन थम्ब’ या संस्थेचे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी हाती घेतली. मार्च २०१२ पासून ते ही मोहीम राबवत आहेत. त्यात पुण्यातील अनेक कंपन्या, उद्योगसमूह, निवृत्त सैनिक तसेच, विविध क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला आहे. गेल्या आठवडय़ात दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपती मंडळासह पुण्यातील अनेक मंडळे त्यात सहभागी झाली आहेत. त्यामुळे या कामाचा वेग वाढला आहे. दिवसाला सुमारे ४०० ट्रक गाळ काढला जात आहे. तो आसपासच्या शेतांमध्ये टाकण्यात येत आहे. त्यासाठी आधुनिक यंत्रे वापरली जात आहेत. ‘ग्रीन थम्ब’कडून मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेत आतापर्यंत सुमारे ८० हजार ट्रक गाळ काढण्यात आला आहे.
यामुळे धरणातील गाळ काही प्रमाणात निघाला आहे. त्याचबरोबर मोठा फायदा म्हणजे धरणाच्या काठावर होणाऱ्या अतिक्रमणांना आळा बसू लागला आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या पुणे सर्कलचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी सांगितले, की खडकवासला धरणाच्या जलाशयाची सीमा खूप मोठी आहे. ते क्षेत्र मोठे असल्याने अतिक्रमण रोखण्यासाठी त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. धरणातील गाळ काढण्याच्या मोहिमेचा त्या दृष्टीने मोठा उपयोग झाला आहे. गाळ काढण्याच्या निमित्ताने जलाशयाच्या परिसरात लोकांची वर्दळ असते. त्यामुळे आपोआपच अतिक्रमण करण्याला आळा बसतो. पुण्याच्या परिसरात सर्वच बाजूंनी मोठय़ा प्रमाणात बांधकामे होत आहेत. धरणांच्या जलाशयाच्या परिसरातही तेच घडत आहे. त्यामुळे या भागांना अतिक्रमणे होण्याचा मोठा धोका आहे. त्याला आळा बसवा म्हणून या मोहिमेचा उपयोग होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ही गोष्ट निदर्शनास येऊ लागली आहे. धरणातील गाळ निघणे आणि अतिक्रमणांवर नियंत्रण या दुहेरी फायद्यामुळे जलसंपदा विभागाकडूनही या मोहिमेला अधिक सहकार्य केले जात आहे.