पुणे : किराणा आणि पतियाळा घराण्याच्या कलाकारांनी केलेल्या गायन स्वरांनी रविवारी ‘स्वरभास्करा’चे पूजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात पं. अजय चक्रवर्ती, श्रीनिवास जोशी, तर सायंकाळी कौशिकी चक्रवर्ती आणि विराज जोशी अशा दोन पिढ्यांतील कलाकारांची मैफील पुणेकरांनी अनुभवली. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने ‘अभिवादन’ कार्यक्रमाचा समारोप झाला.

पं. अजय चक्रवर्ती यांनी ‘गुणकली’ रागातील  ‘हे करतार पुरी करो मन की इच्छा’ आणि ‘गुणकली गुणीजनमें गाओ’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ‘जौनपुरी’ रागातील ‘पायल बाजन लागी रे’ ही बंदिश आणि ‘मोको कहां ढुंढो बंदे’ हे संत कबिरांचे भजन सादर करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

त्यापूर्वी पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी स्वरांजली अर्पण केली. त्यांनी ‘मियाँ की तोडी’ रागातील ‘चंगे नैनवा’ आणि ही ‘आज मोरे मन’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर त्यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या कमी बोलण्यामागील अर्थ विशद करणारी ‘बसंत मुखारी’ रागातील ‘अजब निराला उपजा’ ही स्वरचित बंदिश सादर केली. ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. कौशिकी चक्रवर्ती यांनी ‘पुरिया कल्याण’ रागातील ‘नैन लगे साजन’ ही विलंबित एकतालातील बंदिश आणि द्रुत तीनतालातील रचना सादर केल्या. पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली ‘बहोत दिन बिते’ या रचनेनंतर त्यांनी गौहर जान यांची ‘नान बान जियां मै लागी’ ही ठुमरी सादर केली. त्यापूर्वी विराज जोशी याने ‘पटदीप’ रागातील ‘धन धन भाग’ ही विलंबित एकतालातील, ‘पिया नहीं आयें’ ही  मध्य लय तीनतालातील आणि ‘देबरी मौंदर’ ही द्रुत तीनतालातील अशा तीन रचना सादर केल्या. ‘बाजें मुरलीया बाजे’ आणि ‘अणुरेणुया थोकडा’ या भजनाने त्याने आपल्या गायनाचा समारोप केला. विनोद लव्हेकर यांनी दिग्दर्शित केलेला पं. भीमसेन जोशी यांवरील लघुपट दाखविण्यात आला. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी ‘बागेश्री कंस’ या रागातील ‘प्यारे बलमा’ ही एकतालातील आणि ‘रसिया दिल तन बलमा’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सादर केली.

पंडितजी हे भारतीय संस्कृतीचे एक आध्यात्मिक, दैवी, मूल्याधारित, माणुसकी लाभलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे साधे वागणे आणि संगीताप्रति असलेली समर्पित वृत्ती ही माझ्यासारख्या अनेकांसाठी जणू एक ‘तालीम’ होती. अनेकदा माझी मैफील सुरू होण्यापूर्वी ते तंबोरा जुळवून द्यायचे. कन्या कौशिकी चक्रवर्तीचे कौतुक करताना त्यांनी ‘कौशिकी एकविसाव्या शतकाची प्रमुख गायिका होईल’ असा आशीर्वाद दिला होता.  – पं. अजय चक्रवर्ती, ज्येष्ठ गायक