पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजारात करोनाचा संसर्ग आढळून आल्यानंतर गेले पाच दिवस बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवला होता. जिल्हा प्रशासनाने व्यापारी वर्गाबरोबर केलेल्या चर्चेनंतर सोमवारपासून (२५ मे) भुसार बाजार पुन्हा सुरू झाला. बाजार सुरू झाल्यानंतर राज्य तसेच परराज्यातून एकूण मिळून अन्नधान्याच्या २०० गाडय़ांची आवक झाली.

बाजार आवारात करोनाचा संसर्ग आढळल्यानंतर व्यापारी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे गेल्या मंगळवारपासून (१९ मे) भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी बांधवांनी घेतला होता. आपत्कालीन परिस्थितीत गेले दोन महिने व्यापाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन बाजार सुरू ठेवला होता. पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरकडून सोमवारपासून बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

ते म्हणाले, भुसार बाजार सुरू करण्यापूर्वी संपूर्ण बाजाराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. बाजारात शेतीमालाची मर्यादित वाहने आणण्याची सूचना करण्यात आली. बाजार आवारातील प्रवेशद्वार क्रमांक पाचमधून ठोक खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशद्वारावर तापमापक यंत्राद्वारे प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. जंतुनाशकांचा वापर करण्याच्या सूचना प्रत्येकाला देण्यात आल्या आहेत. बाजारात व्यवहार करताना सामाजिक अंतर पाळावे तसेच मुखपट्टय़ांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून त्यानंतर बाजार आवार सुरू करण्यात आला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

भाजीपाला बाजार सुरू करण्याबाबत बैठक

भुसार बाजार सुरू झाल्याने अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात चढय़ा भावाने विक्री करणाऱ्यांना पायबंद बसला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळे आणि भाजीपाला बाजार गेले दीड महिने बंद आहे. मोशी, उत्तमनगर, मांजरीतील उपबाजारात शेतीमालाची नियमित आवक होत आहे.  शेतीमालाला योग्य भाव मिळावा  म्हणून मार्केट यार्डातील मुख्य भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारी आडते, कामगार संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यात  बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली जाणार असून येत्या आठवडय़ात भाजीपाला बाजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

भुसार बाजार सोमवारपासून सुरू झाला असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बाजाराचे कामकाज सुरू राहणार आहे. भुसार बाजारातील खरेदीदार, व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळून सर्व व्यवहार करावे. ठोक स्वरूपात खरेदी करणाऱ्यांनी गर्दी करू नये. बाजारात भुसार माल मुबलक आहे.

– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना र्मचट्स चेंबर