पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात अज्ञात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्यानं फिर्यादीच्या खिशातील सोळाशे रुपये काढून घेत जिवे मारण्याची धमकी देत कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेत रिक्षा, चारचाकी आणि टेम्पोचं नुकसान झाले आहे.

रोहित चंद्रकांत मुद्दे असे तोडफोड करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्यासह इतर पाच जण फरार आहेत. त्यांचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. या घटनेप्रकरणी राजेश पोपट कांबळे (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास फिर्यादी राजेश हे इंद्रायणी थडी येथील याञेतून घरी आले. तेव्हा घरासमोर टेम्पो लावत असताना अचानक अंधारात दबा धरुन बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्या खिशातून सोळाशे रुपये काढून घेतले. तसेच कोयत्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देखील दिली. आरोपीच्या सोबत असलेल्या पाच जणांनी हातात असलेल्या कोयत्याने आणि लोखंडी पाईपने टेम्पोची तोडफोड करत इतर १३ वाहनांची देखील त्यांनी तोडफोड केली. दरम्यान, फिर्यादी राजेश यांनी आरोपींनी जबर मारहाण केल्याचं देखील म्हटलं आहे. घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.