News Flash

मनोरुग्णालयात ‘अदृश्य’ गट समुपदेशन!

अधीक्षकांव्यतिरिक्त मनोरुग्णालयात काम करणाऱ्या कुणालाच ग्रुप थेरपी क्लिनिक्सच्या अस्तित्वाबद्दल काहीही माहिती नाही. पण अधीक्षकांच्या मते ही क्लिनिक्स सुरू आहेत!

| May 21, 2014 02:55 am

एकच आजार असलेल्या मनोरुग्णांना गटाने समुपदेशन करण्यासाठी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘ग्रुप थेरपी क्लिनिक’ चालवली जातात. या क्लिनिक्सचे वैशिष्टय़ असे, की ती ‘अदृश्य’ आहेत! अधीक्षकांव्यतिरिक्त मनोरुग्णालयात काम करणाऱ्या कुणालाच ग्रुप थेरपी क्लिनिक्सच्या अस्तित्वाबद्दल काहीही माहिती नाही. अर्थातच मनोरुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांनाही या सेवेची खबर नाही; पण अधीक्षकांच्या मते ही क्लिनिक्स सुरू आहेत!
मनोरुग्णांच्या बाह्य़रुग्ण विभागात गेल्यावर समोरच या ग्रुप क्लिनिक्सचा फलक दृष्टीस पडतो. स्किझोफ्रेनिया (छिन्न मानसिकता), डिमेन्शिया (विस्मरण), व्यसनाधीनता आणि नैराश्य या चार आजारांच्या रुग्णांना गटाने एकत्र बसवून त्यांना समुपदेशन करणे, असा या क्लिनिक्सचा उद्देश आहे. यासाठी गट समुपदेशनात सहभागी होऊ शकणाऱ्या मनोरुग्णांची वेगळी यादी तयार करणे आणि नंतर त्यांना क्लिनिकच्या ठरलेल्या वेळात बोलवून मानसोपचारतज्ज्ञ, प्रशिक्षित परिचारिका, समुपदेशक यांनी मिळून समुपदेशन करणे अभिप्रेत आहे. मनोरुग्णांना एकमेकांचे अनुभव ऐकायला मिळावेत आणि बरे होऊन सामान्य जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी हा या गट समुपदेशनाचा उद्देश आहे. प्रत्यक्षात यातील काहीच येरवडा मनोरुग्णालयात घडत नाही.  
बाह्य़रुग्ण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रुप क्लिनिकच्या फलकावर ज्या डॉक्टरांची नावे लिहिली आहेत त्यांच्यापैकी काही डॉक्टरांची मनोरुग्णालयातून बदली होऊनही वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. गट समुपदेशनाबद्दलच्या कोणत्याही लिखित नोंदीही मनोरुग्णालयाकडे नसल्याचे समजते.
क्लिनिकबाबत विचारणा केली असता मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे म्हणाले, ‘‘गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून मनोरुग्णालयात ग्रुप थेरपी क्लिनिक्स सुरू आहेत, परंतु सुरूवात असल्याने त्याला प्रतिसाद मिळत नाही. बाह्य़रुग्ण विभागात आलेले रुग्ण आणि डिस्चार्ज दिलेले रुग्ण यातून क्लिनिकसाठी मनोरुग्ण निवडले जातात व त्यांचे समुपदेशन केले जाते. मानसोपचारांसाठी प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका आणि मानसोपचारतज्ज्ञ मिळून ही क्लिनिक घेतात. उपचारांनंतर सामान्य आयुष्य जगता यावे यासाठी त्यांना विशेष समुपदेशन केले जाते.’’
अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार ही क्लिनिक्स सुरू असली तरी मनोरुग्णालयातील कुणालाच त्यांच्या अस्तित्वाविषयी काहीच माहिती कशी नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 2:55 am

Web Title: group thearapy clinic in yerawada mental hospital
Next Stories
1 सीसीटीव्ही बसविण्यासाठी दुसरे दाभोलकर घडण्याची वाट पाहणार का? – डॉ. हमीद दाभोलकर
2 पुण्यात ‘शाही’ विवाहसोहळे वाढता वाढता वाढे.!
3 महाविद्यालयांसाठीची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना कागदावरच
Just Now!
X