भारतीय जनता पक्षाच्या झंझावातामुळे पिपरीत काँग्रेसची दाणादाण उडाली. एके काळी शहरात सर्वेसर्वा असलेल्या काँग्रेसला आता अस्तितत्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शहराध्यक्ष सचिन साठे यांना हटवण्याची मागणी पक्षातील एका गटाने चांगलीच लावून धरली असून अशोक मोरे यांचे नाव पुढे केले आहे. यानिमित्ताने सुरू असलेल्या घडामोडींमुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मात्र चांगलीच डोकेदुखी झाली आहे.

शहरातील काँग्रेस आणि गटबाजीचे राजकारण यांच्यात अतूट नाते आहे. एकत्रित काँग्रेस होती, तेव्हा पवार-मोरे असे प्रबळ गट होते. हनुमंत गावडे, श्रीरंग बारणे, भाऊसाहेब भोईर हे दिग्गज जेव्हा काँग्रेसमध्ये कार्यरत होते. तेव्हा गटबाजीचे तीव्र प्रदर्शन होत होते. साठे स्थानिक पातळीवर कार्यरत झाल्यानंतर भोईर व साठे यांच्यात टोकाची गटबाजी झाली. भोईर यांच्यामागे नगरसेवक होते. तर, साठे यांच्यासोबत संघटनात्मक पदाधिकारी होते. दोहोंत समन्वय न राहिल्याने त्यांच्यातील गटबाजी सर्वानी बराच काळ अनुभवली.

पालिका निवडणुकांच्या तोंडावर भोईर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे समर्थक नगरसेवकही राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर, सचिन साठे स्थानिक पातळीवर ‘सर्वेसर्वा’ झाले. निष्ठावंत गटातील जुने कार्यकर्ते असलेल्या साठे यांच्यावर प्रदेशातील नेत्यांचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. निवडणुकांच्या दृष्टीने जे काही निर्णय झाले, ते साठे यांच्या कलाने झाले. मात्र, निवडणुकीत शहरातील अनेक भागात काँग्रेसला उमेदवारच मिळाले नाही. शहरातून काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट ठेवलेल्या काँग्रेसची वाताहात झाली.

या पराभवाची जबाबदारी स्वीकारून साठे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे उरले-सुरले अवसानही गळाले. साठे यांचा राजीनामा स्वीकारू नये म्हणून साठे समर्थकांनी प्रदेशाध्यक्षांना साकडे घातले. त्याचवेळी, पक्षातील साठे विरोधकांनी उचल खाल्ली. साठे यांचा राजीनामा मंजूर करावा, असा आक्रमक पावित्रा घेत पक्षातील जुने कार्यकर्ते अशोक मोरे यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवावी, अशी मागणी या गटाने लावून धरली आहे.

गृहकलह थांबेना

पक्षाचे ‘तीन तेरा’ वाजले असताना आणि आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला कोणतेही भवितव्य राहिले नसताना, पक्षउभारणी करायचे सोडून नव्याने पक्षांर्तगत वाद सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्षही वैतागले आहेत. या संदर्भात, लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिले आहे. मात्र, तरीही ‘गृहकलह’ थांबण्याची चिन्हे नाहीत.