‘जीएसटी’ म्हणजे काय रे भाऊ?

समाजमाध्यमांवर (सोशल मिडीया) गेल्या काही दिवसांपासून वस्तू व सेवाकराची (जीएसटी) जोरदार खिल्ली उडवणाऱ्या चित्र-विचित्र विनोदांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. ‘जीएसटी’ म्हणजे काय रे भाऊ म्हणत, वस्तू सेवाकराच्या अनेक ‘स्व’रचित व्याख्या प्रसारित झाल्या आहेत. जीएसटी लागू होण्यापूर्वी, लागू होत असताना आणि प्रत्यक्ष जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ‘व्हायरल’ झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या या विनोदांचा सध्या तुफानी ‘कल्ला’ सुरू आहे. सातत्याने ‘ऑनलाईन’ असणाऱ्या ‘नेटकऱ्यां’कडून यानिमित्ताने सरकारी धोरणांना करकचून चिमटे काढण्याचे काम ‘इमानेइतबारे’ सुरू आहे.

‘एक देश, एक करप्रणाली’ असलेल्या ‘जीएसटी’चा शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात थाटामाटात प्रारंभ झाला. सर्वात मोठी करसुधारणा मानल्या जाणाऱ्या या ‘जीएसटी’वरून देशभरातील वातावरण ढवळून निघाले, त्याला ‘सोशल मिडीया’ कसा अपवाद राहू शकेल. घोषणा झाल्यापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईपर्यंतच्या कालावधीत ‘जीएसटी’ हाच विषय समाजमाध्यमावर अग्रस्थानी आहे. भारत हा जगातील पहिला देश असेल, जिथे नियम तयार नाहीत, व्यापारी तयार नाहीत आणि कसलेही सॉफ्टवेअर तयार नसताना हा नवीन कायदा लागू करण्यात येत आहे. सरकारला मात्र कोणाचीच तयारी नाही, हे मान्यच नाही. ‘जीएसटी’ अशा सुनेप्रमाणे आहे, की जी नांदायला येण्यापूर्वीच शेजारपाजारच्या महिलांनी तिची लक्षणे ठीक नसल्याचा ठपका ठेवला आहे, असे काही संदेश प्रारंभी सगळीकडे फिरत होते. ‘जी मुले ३० जूनच्या रात्रीनंतर जन्माला येतील, ती मुले महाग पडतील की स्वस्त?’ असा खटय़ाळ प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. ‘जीएसटी’बद्दल सरकारचा तोच दृष्टिकोन आहे, जो लग्नाबद्दल भारतीय आईवडिलांचा असतो. तो म्हणजे, एकदा होऊन जाऊ दे, नंतर हळूहळू समजायला लागेल, अशी खिल्ली उडवण्यात आली आहे. अमेरिका दौऱ्यावर गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली, तेव्हा ‘जीएसटी’मुळे तंबाखू तर महाग होणार नाही ना, अशी विचारणा ट्रम्प यांनी मोदींकडे केल्याचा शोध नेटकऱ्यांनी लावला आहे.

३० जूनला नवीन संदेश बाहेर पडला. जीएसटी म्हणजे ‘गेम स्टार्ट टुमारो’. देशाच्या इतिहासात मध्यरात्री महत्त्वाच्या घटना घडल्याचा संदर्भ देत, मध्यरात्रीच लागू करण्यात आलेल्या जीएसटीला उद्देशून ‘मन क्यो बहका रे बहका, आधी रात को’ या लोकप्रिय गाण्याचे स्मरण करण्यात आले आहे. जीएसटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, चांगली व सोपी करप्रणाली अशी जीएसटीची व्याख्या मोदींनी केली असली तरी, समाजमाध्यमांवर जीएसटीच्या विविध व्याख्या सांगणारे अनेक विनोद प्रसिद्ध झाले आहेत. ‘जीएसटी म्हणजे ‘गुड नाईट, स्वीट ड्रीम्स्, टेक केअर’, ‘गरिबांना सतावणारी टेक्निक म्हणजे जीएसटी’, ‘गरिबांना संपवून टाका म्हणजे जीएसटी’, ‘गर्ल्स सेल्फी टॅक्स’ म्हणजे जीएसटी. अजूनही हा धमाका सुरूच आहे. कारण, जीएसटीचा घोळ सुरू असताना पुन्हा एक संदेश व्हायरल झाला. पत्नी पतीला विचारते की, जीएसटी म्हणजे काय? नवरा समजावून सांगतो की, लग्नापूर्वी घरी यायला उशीर झाल्यास आई, वडील, भाऊ, बहीण अशा सर्वाना कारणे सांगावी लागत होती. लग्नानंतर तुला एकटीला सांगितले तरी पुरे होते, यालाच जीएसटी म्हणायचे. आणखी एक भन्नाट विनोद म्हणजे, पत्नी पतीला विचारते की, तुमचे माझ्यावर किती टक्के प्रेम आहे. पती विचारपूर्वक उत्तर देतो, ८२ टक्के! पत्नी विचारते, १०० टक्के का नाही. तेव्हा पती सांगतो, की १८ टक्के ‘जीएसटी’. आता तर, ‘जीएसटीवर आधारित विनोद पाठवू नका, अन्यथा २८ टक्के बॅटरी आपोआप उतरेल’, अशा विनोदांनी कळस गाठला आहे.