मार्केटयार्डात दररोज आठ ते दहा टन पेरूंची आवक

पेरूचा हंगाम सुरू झाला असून कराड परिसरातून रायपूर जातीच्या पेरूची आवक पुण्यात सुरू झाली आहे. पाचशे ग्रॅम ते एक किलो एवढे वजन असलेला रायपूर जातीच्या पेरू सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात दररोज आठ ते दहा टन पेरूची आवक सध्या होत आहे. सध्या पेरूचा हंगाम बहरात आला असून आवक वाढली आहे. यात लखनौ ४९, सरदार, जयविलास, गुलाबी, रायपूर या जातीच्या पेरूंचा समावेश आहे. ग्राहकांकडून गावरान पेरूला मोठी मागणी आहे. मात्र, आकाराने मोठा असलेला रायपूर जातीचा पेरू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. आवक वाढल्याने पेरूच्या भावात घट झाली आहे. पेरूच्या वीस किलोच्या पाटीला तीनशे ते पाचशे रुपये भाव मिळत आहे.

अहमदनगर जिल्ह्य़ातील नेवासा, शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, बुलढाणा या भागातून पेरूची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्य़ातील उरळी कांचन, थेऊर या भागातून गावरान पेरूची आवक सुरू आहे. जुलै ते फेब्रुवारीदरम्यान पेरूचा हंगाम सुरू असतो. सध्या पेरूचा हंगाम बहरात आला आहे. लखनौ ४९ आणि सरदार जातीचे पेरू अन्य जातीच्या पेरूपेक्षा गोड असतात. गेल्या काही वर्षांपासून पेरूवर प्रक्रिया करून पल्प तयार करण्याचा व्यवसाय वाढीला लागला आहे. पल्प, जाम, औषधे, भुकटी तसेच आईस्क्रीम निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून पेरूला मोठी मागणी असते. आवक वाढल्याने पेरूचे भाव सध्या कमी झाले आहेत. मार्गशीर्ष महिन्यात महिलांकडून दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात पेरूला मागणी वाढेल, अशी माहिती पेरूचे                व्यापारी संतोष ओसवाल यांनी दिली.

रायपूर जातीच्या पेरूचे व्यापारी सुनिल बोरगे म्हणाले, सध्या कराड परिसरातून रायपूर जातीच्या पेरूची आवक सुरू झाली आहे. कमी बिया, आकाराने मोठा आणि चवीला कमी गोड असलेल्या रायपूर जातीच्या पेरूची दररोज चारशे पेटी आवक होत आहे. या जातीच्या पेरूला प्रतिकिलो साठ ते एकशेवीस रुपये असा भाव मिळाला आहे. घरगुती ग्राहकांपेक्षा आईस्क्रीम उत्पादकांकडून रायपूर पेरूला मोठी मागणी आहे.

वैशिष्टय़े

* पाचशे ग्रॅमपासून एक किलो वजनाचा पेरू

* कमी बिया, चवीला कमी गोड

* आइस्क्रीम उत्पादकांकडून पेरूला मोठी मागणी

* विविध जातींच्या पेरूंची रोज आठ ते दहा टन आवक

गुलाबी पेरू

पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातून मार्केटयार्डातील फळबाजारात गुलाबी रंगाच्या पेरूची आवक सुरू झाली आहे. गुलाबी रंगाच्या पेरूची एक ते दोन टन आवक झाली असून प्रतिकिलो पंचवीस ते चाळीस रुपये असा भाव मिळाला आहे.