चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हटलं की उन्हाळ्याचा दाह कमी करणाऱ्या मोगऱ्याचा गंध, वाळ्याचा सुगंध असलेले थंडे पाणी आणि वाळ्याचे अत्तर, कैरीचे पन्हे आणि कैरी घालून केलेली डाळ असे समीकरण ठरलेले आहे. मराठी वर्षांरंभाचा पहिला दिवस असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शुक्रवारपासून (८ एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे संगीत महोत्सवाचा प्रारंभ होत आहे.
ट्रस्टच्या गणपती मंदिराच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढी पाडवा ते रामनवमी (१५ एप्रिल) असा हा संगीत महोत्सव गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी सात वाजता होणार आहे. राजेश दातार, विभावरी देशपांडे आणि सहकाऱ्यांचा सहभाग असलेल्या ‘गीत गाता चल’ या कार्यक्रमाने शुक्रवारी संगीत महोत्सवाची सुरूवात होणार आहे. उत्सव नात्यांचा, आशा खाडिलकर आणि वैदेही खाडिलकर यांचा ‘स्वर वंदना’, महेश काळे आणि सुबोध भावे यांचा ‘सूर निरागस हो’, गायक-संगीतकार श्रीधर फडके यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’, पं. तेजेंद्र मुजुमदार यांचे सरोदवादन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. ‘परंपरा’मध्ये शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर यांचे गायन होणार असून पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ कार्यक्रमाने संगीत महोत्सवाची रामनवमीला सांगता होणार आहे.
रामकृष्ण मठातील मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मठातर्फे श्रीराम नवमीनिमित्त ११ ते १३ एप्रिल असा तीन दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. दांडेकर पुलाजवळील मठामध्ये दररोज सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या महोत्सवात गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध असलेले अतुल खांडेकर, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक कैवल्यकुमार गुरव आणि विजय कोपरकर यांचे गायन होणार आहे. रामनवमीला (१५ एप्रिल) आरती, पूजा, होमहवन, श्रीरामनाम संकीर्तन आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.