पारंपरिक पद्धतीने घरोघरी उभारण्यात आलेली सुख-समृद्धीची गुढी.. ढोल-ताशा पथके आणि बँडपथकांसह शहराच्या विविध भागांतून निघालेल्या शोभायात्रा.. पुस्तक गुढी आणि पुस्तक दिंडी अशा उपक्रमांतून वाचनसंस्कृती जोपासण्याचा दिलेला संदेश.. गायन-वादनाच्या सुरेल मैफिली .. शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी झालेली गर्दी.. पारंपरिक पेहरावामध्ये एकमेकांना शुभेच्छा देणारे युवक-युवती.. अशा जल्लोषात गुढीपाडवा साजरा करीत पुणेकरांनी रविवारी मराठी नववर्षांचे स्वागत केले.

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ महापौर मुक्ता टिळक आणि संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक देखणे यांच्या हस्ते ग्रामगुढी उभारण्यात आली. मंदिरापासून ते शनिपार चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.  प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ ,  लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेहरावातील चिमुकले, बँड आणि ढोल- ताशा पथक असे स्वरूप असलेल्या शोभायात्रेत लाठी काठीची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

मैत्र युवा फाउंडेशनतर्फे टिळक चौकात सुरक्षित वाहतुकीची गुढी आणि आचार्य अत्रे सभागृह येथे पुस्तक दिंडी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, सहायक पोलीस निरीक्षक सूरज पाटील, मैत्र युवाचे अध्यक्ष संकेत देशपांडे उपस्थित होते. पुस्तक दिंडीत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, डॉ. न. म. जोशी, डॉ. रामचंद्र देखणे, मिलिंद जोशी सहभागी झाले होते. तालानुभूती फाउंडेशन आणि एमपी ग्रुपतर्फे  ‘स्वरपर्व’ कार्यक्रमात अयान अली बंगश यांचे सरोदवादन झाले. त्यांनी ‘ललित’ आणि ‘आनंद भैरव’ रागातील रचना सादर केल्या. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यावर समर्पक साथ केली. विनायक घोरपडे आणि रोहित मुजुमदार यांच्या हस्ते अयान अली बंगश यांना स्वरगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शनिवार पेठ नेने घाट गणेश मंडळाने ५५ किलो वजनाच्या द्राक्षघडांचा भोग चढवून गणपतीची पूजा बांधली. वंचित विकास व नीहार या सामाजिक संस्थांना ही द्राक्षे देण्यात आली. शारदा ज्ञानपीठमचे पं. वसंत गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गुढी उभारण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आठवले यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवात भीमण्णा जाधव आणि सहकाऱ्यांचे सुंद्रीवादन आणि जितेंद्र भुरुक व रेश्मी मुखर्जी ‘तुम आ गये हो’ हा लोकप्रिय हिंदूी गीतांचा कार्यक्रम सादर केला. मंदिरामध्ये सकाळी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ.बसवराज तेली आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गुढी उभारण्यात आली. गणेशयाग करण्यात आला. संवाद पुणे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद कोथरूड शाखा आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘नादवेध’ हा कार्यक्रम संगीत अभ्यासक सुलभा पिशवीकर आणि अच्युत गोडबोले यांनी सादर केला. यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्ष ल. म. कडू यांच्या हस्ते सांस्कृतिक गुढी उभारण्यात आली.