शेअर निर्देशांक अर्थात ‘सेन्सेक्स’ने पुन्हा २६ हजाराला गाठले. सलग चार वर्षांच्या मंदीनंतर शेअर बाजाराचा हा ताजा मूडपालट लक्षणीय असला तरी आपल्या पदरी लाभ पाडणारा हा कल यापुढे तरी ठरेल काय? कमाईच्या पैशातून केलेल्या गुंतवणुकीतील नफ्याचा टक्का उंचावत असल्याचे पाहण्याची सवय आता आपण स्वत:ला लावून घ्यावीच आणि या कामी ‘लोकसत्ता’ तुमची सोबत करेल.
मराठी वाचकांच्या अर्थसाक्षरतेसाठी नेहमीच सजग असलेल्या ‘लोकसत्ता’ने गुंतवणूकविषयक गुंतवणूकविषयक जागराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरात गुंतवणूकदार मार्गदर्शन मेळाव्याचा कार्यक्रम योजण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य तत्त्वाने प्रवेश असलेल्या या कार्यक्रमानिमित्ताने वाचकांना तज्ज्ञांशी थेट संवादाची व शंकानिरसनाची संधीही मिळणार आहे.
या मेळाव्यात थाऊजंड लाईटस् कंपनीचे संचालक अभय दांडेकर, वेल्थ मॅनेजर्स (इं) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक भरत फाटक आणि बँकिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ विद्याधर अनास्कर हे तज्ज्ञ मान्यवर गुंतवणूकदारांचे मार्गदर्शन करतील.
शेअर बाजाराला हवे ते स्थिर सरकार मिळाले आहे. पर्यायाने दीर्घकालीन तेजीच्या दिशेने बाजार जोमाने अग्रेसर आहे. बाजारात नफ्याच्या संधी यापुढेही आहेत. ताज्या अर्थसंकल्पाने तर करवजावटीसाठी जास्तीच्या गुंतवणुकांची मुभा दिली आहे. या सर्वाविषयी उपयुक्त मार्गदर्शनही या कार्यक्रमानिमित्ताने केले जाईल. केवळ शेअर गुंतवणूकच नव्हे, तर प्रत्येकाला त्याच्या जोखीमक्षमतेनुसार पेलेल-रुचेल असे भविष्य निर्वाह निधी, म्युच्युअल फंड, पेन्शन, डेरिव्हेटिव्हज्, जमीनजुमला ते सोने व मौल्यवान धातूंपर्यंतच्या गुंतवणुकीचा विविधांगी पट खुले करणारे ‘अर्थब्रह्म’ हे पुस्तक वाचकांसाठी खरे तर गुंतवणुकीचे पूर्णत्वच ठरावे.