क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पुण्यातील चाळीस क्रीडापटू तसेच सहा क्रीडा मागदर्शकांना महापालिकेकडून क्रीडा पुरस्कार देऊन शनिवारी गौरविण्यात आले. महापालिकेतर्फे जीवन गौरव पुरस्कारही दरवर्षी प्रदान केला जाणार असून श्रीमती गुरुबन्स कौर यांना या या पुरस्काराने गौरविण्यात आले. महापौर वैशाली बनकर, खासदार वंदना चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला क्रीडा संघटक, खेळाडू, मार्गदर्शक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आमदार रमेश बागवे, बापू पठारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर दीपक मानकर, क्रीडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.राज्य शासन ज्या प्रमाणे दरवर्षी क्रीडापटूंचा गौरव करते त्याचप्रमाणे पुणे शहरातील क्रीडापटूंचा गौरव करण्यासाठी या वर्षीपासून महापालिकेतर्फे हे पुरस्कार सुरू केल्याचे बागवे यांनी यावेळी सांगितले. गुरुबन्स कौर यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असून मार्गदर्शक, संघटक म्हणून त्या आजही सक्रिय आहेत. जीवन गौरव पुरस्काराबरोबरच सहा क्रीडामार्गदर्शकांना कै. बाबुराव दगडू गायकवाड क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आले, तर कै. हरिश्चंद्र बिराजदार पुरस्काराने चाळीस क्रीडापटूंना कार्यक्रमात गौरविण्यात आले.
खेळाडू, पालकांची मूकनिदर्शने
दरम्यान, या पुरस्कारांच्या निवडीमध्ये मोठा घोटाळा व वशिलेबाजी झाल्याचा आरोप करत अनेक खेळाडू, त्यांचे पालक आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेत मूकनिदर्शने केली. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या सर्वाच्या वतीने पालिका पदाधिकाऱ्यांसमोर बाजू मांडली. उपस्थितांमधील किमान पंचवीस खेळाडूंवर अन्याय झाल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनीही मान्य केले. या सर्वाचा यथोचित सन्मान येत्या दहा दिवसात केला जाईल, असे आश्वासन अविनाश बागवे यांनी यावेळी दिल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.