टाळेबंदीच्या काळात निरपेक्षपणे केलेल्या कार्याबद्दल डॉ. सतीश चव्हाण आणि वंदे मातरम् संघटना, महाराष्ट्र या संघटनेला यंदाचा गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार तर, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती शिंत्रे आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष दाते यांना इंदिराबाई अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या वतीने आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार आणि इंदिराबाई अत्रे पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येकी सात हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आबासाहेब अत्रे पुरस्काराचे तर, प्रत्येकी पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे इंदिराबाई अत्रे पुरस्काराचे स्वरूप आहे.
करोनाच्या बिकट परिस्थितीशी लढताना हजारो डॉक्टर, पोलीस, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी निरपेक्षपणे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची, त्यांच्या अन्न-निवाऱ्याची व्यवस्था केली. प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करत अभूतपूर्व कार्य करणाऱ्या असंख्य करोना योद्धय़ांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या उद्देशाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण डिसेंबर महिन्यात डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे, असे पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे यांनी सांगितले.