गेल्या दोन वर्षांत पुण्यात तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यात झालेल्या एकूण गुटखा जप्तीत पुण्याचा ९ टक्के वाटा आहे.
राज्यातील गुटखा बंदीला उद्या दोन वर्षे पूर्ण होत आहेत. १९ जुलै २०१२ ला राज्यात गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदी लागू झाली. त्यानंतर १८ जुलै २०१३ ला या बंदीत आणखी एका वर्षांने वाढ करून गुटखा आणि पानमसाल्याबरोबर सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीवरही बंदी घालण्यात आली. पुणे विभागात (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) गेल्या दोन वर्षांत ५ कोटी ७२ लाख रुपयांचा गुटखा पकडला गेला आहे. संपूर्ण राज्यात झालेल्या गुटखा जप्तीशी तुलना करता १६ टक्के गुटखा जप्ती पुणे विभागात झाली आहे. पुणे विभागातील जप्तीत मात्र पुणे जिल्हा आघाडीवर असून विभागातील ५६ टक्के जप्ती एकटय़ा पुणे जिल्ह्य़ात करण्यात आली आहे.
अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, ‘‘गुटखा बंदीनंतरची सुरुवातीची काही जप्ती प्रकरणे सोडता इतर सर्व प्रकरणांमध्ये अन्न व औषध विभागाने पोलिसांना कारवाईत सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक वेळी पकडलेल्या मालाचा प्रथम माहिती अहवाल दाखल केला जातो. तसेच न्यायालयात खटलाही दाखल केला जात असल्यामुळे गुटखा बंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्य होत आहे.’’ दोन वर्षांत पुण्यात गुटखा जप्तीच्या १२७ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर १०२ प्रकरणांत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईचे टाटा मेमोरिअल सेंटर आणि नागपूरचे शासकीय दंत महाविद्यालय यांनी अनुक्रमे १९९५ आणि २०१३ मध्ये केलेल्या संशोधनांमध्ये सुपारी, गुटखा आणि पानमसाला यांच्या सेवनाचा ‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’ या कर्करोगसदृश आजाराशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सव्र्हे ऑफ इंडिया – २००९-१०’ अनुसार देशात ३५ टक्के प्रौढ व्यक्ती कोणत्याही एका प्रकारात तंबाखूचे सेवन करत असल्याचे समोर आले होते. यापैकी २१ टक्के लोक धूम्रविरहित तंबाखू खातात, असेही या सर्वेक्षणात दिसून आले होते.