ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरू पं. वसंतराव राजूरकर (वय ८३) यांचे दीर्घ आजाराने हैदराबाद येथे शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर या त्यांच्या पत्नी होत. पं. राजूरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजता हैदराबाद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
वसंतराव राजूरकर यांचा जन्म २४ एप्रिल १९३२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. ज्येष्ठ गायक आणि ग्वाल्हेर दरबारचे राजगायक पं. राजाभैय्या पूंछवाले यांनी सुरू केलेल्या ग्वालियार म्युझिक कॉलेजचे विद्यार्थी असलेले प्रसिद्ध गायक गोविंदराव राजूरकर हे वसंतरावांचे काका आणि गुरू होत. वसंतरावांनी गायन शाळेत संगीत विशारद केले. राजाभैय्या यांनी अजमेरला संगीत विद्यालय सुरू करून तेथे गोविंदराव यांना प्राचार्य म्हणून पाठविले. पुढे अजमेर येथे गेल्यानंतर वसंतरावांचे काकांकडे संगीत शिक्षण झाले. राजाभैय्या यांच्या घरी दर गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये वसंतराव तंबोऱ्याची साथ करीत. जयपूर येथे आकाशवाणीमध्ये वि. रा. आठवले यांनी त्यांना वडीलभावासारखे सांभाळले. एकदा पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या मैफलीत तंबोऱ्याबरोबरच वसंतरावांनी आपल्या स्वराची चुणूकही दाखविली.
हैदराबाद येथील म्युझिक कंपनीमध्ये नोकरी स्वीकारून वसंतराव १९५४ मध्ये तेथेच स्थायिक झाले. अजमेर येथे काकांकडे गेल्यानंतर त्यांची शिष्या मालिनी वैद्य यांच्याशी वसंतरावांचा परिचय झाला आणि पुढे हे दोघेही विवाहबद्ध झाले. मालिनी राजूरकर यांच्या गायिका म्हणून जडणघडणीत गोविंदराव यांच्याइतकाच वसंतरावांचाही महत्त्वाचा वाटा आहे. पारंपरिक राग आणि आधुनिक राग मांडताना ख्यालाची शैली थोडी बदलते. त्यामुळे गाणं एकांगी असून चालत नाही तर त्यामध्ये थोडे बदल करावे लागतात, हा वसंतरावांनी दिलेला वस्तुपाठ मालिनीताईंनी आचरणात आणून आपली गायकी समृद्ध केली. मालिनी राजूरकर यांच्या गायिका होण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वसंतरावांनी स्वत:मधील गायकाला बाजूला ठेवणे पसंत केले. प्रभा लिमये, नितीन वेलणकर, आराधना कऱ्हाडे-शास्त्री आणि मुक्ता धर्म यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना विद्यादान करणारे वसंतराव हे अखेपर्यंत ग्वाल्हेर घराण्याचे निष्ठावान पाईक आणि हाडाचे शिक्षक म्हणून कायम पडद्यामागेच राहिले. प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर यांनी वसंतरावांकडून टप्पा या गायनप्रकाराचे मार्गदर्शन घेतले आहे.

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव