पिंपरीतील ‘एचए’ कंपनीतील कामगारांचे हाल अद्याप सुरूच असून सहा महिन्यांपासून पगार होत नसल्याने दसरा-दिवाळीत करायचे काय, असा प्रश्न कामगारांना सतावतो आहे. स्थानिक खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. तरीही, याप्रश्नी सरकारकडून गंभीर दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची मन:स्थिती झाल्याचे कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटसकर यांनी म्हटले आहे.
‘एचए’ कंपनी आर्थिक संकटात असल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. दसरा व दिवाळी सण तोंडावर असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. या संदर्भात, पाटसकर म्हणाले की, कामगार संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली व रसायनमंत्री अनंतकुमार यांच्याशी भेट घडवली. लक्ष घालू, प्रश्न सोडवू, असे आश्वासन आम्हाला मिळाले. मात्र, कार्यवाही काहीच झाली नाही. केंद्र सरकार एचए कामगारांचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही, असे दिसते. कोणीच काही करत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी बाहेर पडण्याची मानसिकता कामगारांमध्ये नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मतदानावर बहिष्कार टाकू.