डॉ. विजय कनुरू यांचे संशोधन

प्रचंड प्रदूषणाला सामोरे जाताना त्याचे शरीरावर काही ना काही प्रमाणात अपाय होतात. मात्र, संशोधक डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने हळद रसाची निर्मिती केली असून, या हळद रसाचे सेवन करून प्रदूषणाचे शरीरावरील दुष्पपरिणाम टाळणे शक्य असल्याचा त्यांचा दावा आहे.

डॉ. विजय कनुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठातील शिक्षण झाल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले. नॅनो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने त्यांनी पाण्यात न विरघळणाऱ्या हळदीला रसाचे स्वरूप दिले आहे. हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून, त्यातून कर्क्युमिन हे औषधी द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळते. या हळद रसाला त्यांनी ‘हरस टर्मेरिक ज्यूस’ असे नाव दिले आहे. या संशोधनासाठी त्यांना विद्यापीठातील डॉ. स्वप्नील कांबळे आणि नॅशनल टॉक्सिकोलॉजी सेंटरच्या डॉ. किशोरी आपटे यांनी साहाय्य केले.

‘आपल्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश असला, तरी त्यात कक्र्युमिन या औषधी द्रव्याची मात्रा फारच कमी असते. तसेच जे औषधी गुण मिळतात, ते शरीरात पूर्णत: शोषले जात नाहीत. हरस टर्मेरिक ज्यूसच्या निर्मितीत नॅनो टेक्नोलॉजीचा वापर झाल्यामुळे त्यात कक्र्युमिन द्रव्याचे प्रमाण चांगले राखता आले. त्यामुळे ते पेशींमध्ये चांगल्या प्रकारे शोषले जाते,’ असे त्यांनी सांगितले.

‘शहरातील वाहनांची गर्दी, बांधकामांमुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. या वातावरणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. वातावरणातील अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांवाटे रक्तात मिसळत असल्याने शरीरात ठिकठिकाणी सूज येऊ  शकते. हृदयाच्या रक्तवाहिन्या, यकृत आदी अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. नॅनो टेक्नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस पाण्यात विरघळण्याजोगा आहे. या रसाचे सेवन केल्यास प्रदूषणाचे दुष्परिणाम रोखता येतील. या रसामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासह त्वचा निरोगी होऊ शकते,’ असे डॉ. कनुरू यांचे म्हणणे आहे.

स्वामित्व हक्कांसाठी अर्ज दाखल

डॉ. कनुरू गेली पाच ते सहा वर्षे हे संशोधन करत होते. त्यांनी आपल्या संशोधनाचे दोन गुंतवणूकदारांच्या साहाय्याने हरस बेव्हरेजेस या स्टार्टअपमध्ये रूपांतर केले आहे. या रसाला अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाने (एफएसएसआय) प्रमाणित केले आहे. तसेच या संशोधनाचे स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे.